दुकानदारांवर नियमांची सक्ती.. पण हातगाडीवाले मात्र सुसाट! प्रशासनाच्या भुमिकेवरच प्रश्‍नचिन्ह

hatgadi 1.jpg
hatgadi 1.jpg

नाशिक : प्रशासनाने गर्दी कमी होण्यासाठी व्यावसायिकांसाठी सम विषम तारखेचा पर्याय ठेवला आहे. परंतु यामुळे मेनरोडवरील गर्दीला अटकाव होण्याऐवजी गर्दीत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा रस्त्यावरील हातगाड्यांवर खरेदीदारांची गर्दी वाढू लागल्याने दुकाने रिकामी परंतु हातगाड्यांवर गर्दी असे चित्र असल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. 

...तर शहरात मालेगावपेक्षाही गंभीर परिस्थिती
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समविषमचा पर्याय निवडला खरा, परंतु पोलिस व मनपा प्रशासनातील समन्वयाच्या अभावी अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंची दुकाने उघडी ठेवली जात असल्यामुळे प्रशासनाच्या भुमिकेवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. शहरात कालपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 259 वर पोहोचला आहे, त्यापार्श्‍वभूमीवर प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, परंतु गेल्या तीन दिवसांपासून मेनरोडसह रविवार पेठ, शिवाजी रोड, महात्मा गांधी रोडवर मोठी गर्दी उसळली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असूनही नागरिक सोशल डिस्टन्स पाळण्याच्या मानसिकतेत नसल्याने भविष्यात शहरात मालेगावपेक्षाही गंभीर परिस्थिती उद्‌भवू शकते, अशी परिस्थिती आहे. 

दुकानदार त्रस्त 
मेनरोडवरील बहुसंख्य दुकाने शासनाच्या नियमाच्या आधीन राहून उघडली जात असलीतरी ग्राहकांनी दुकानांकडे पाठ फिरविली आहे. गरजेची वस्तू हातगाडीवर विकत घेऊन ताबडतोब घराकडे जाण्याचा पर्याय असलातरी यामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहे. ग्राहकांबाबत सर्व प्रकारची काळजी घेऊन, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून, शासनाचे सर्व प्रकारचे टॅक्‍स भरूनही मनस्तापच होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दुकानदार ग्राहक आल्यावर सॅनिटायजर्स, मास्कचा वापर करतात, परंतु हातगाडीवाले मात्र यातील कोणतेही नियम पाळत नसल्याकडे काही दुकानदारांनी लक्ष वेधले आहे. सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता हातगाड्यांवर होणारी गर्दी कोरोना वाढीसाठी अनुकूल ठरू शकते, अशी भितीही काहींनी व्यक्त केली. वाढत्या गर्दीला दुकानदार नव्हे तर हातगाडीवर व्यवसाय करणारे जबाबदार असल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 
 
हातगाड्यांची संख्या मोठी 
मेनरोड, शिवाजी रोड, महात्मा गांधी रस्ता आदी ठिकाणी हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सातशे ते आठशे आहे. याविक्रेत्यांकडून सोशल डिस्टसिंगसह अन्य कोणतेही नियम पाळले जात नाहीत. विशेष म्हणजे हातगाडीवरील अनेक व्यावसायिक दाट वस्तीच्या परिसरातून आलेले असल्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. सर्व नियमांचे पालन करणाऱ्या दुकानदार व्यावसायिकांसाठी ज्या कडक नियमांची अपेक्षा केली जाते, तीच हातगाडीवाल्यांच्या बाबतीतही दाखवायला हवी, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com