सत्ताधाऱ्यांकडून यांत्रिकी झाडू खरेदीचा घाट; पालिका प्रशासनाच्या प्रयत्नांबद्दल आश्‍चर्य व्यक्त

विक्रांत मते
Thursday, 28 January 2021

विकासकामांसाठी निधी नसल्याने कर्ज काढण्याची तयारी होत असताना दुसरीकडे सहा यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून होत आहे.

नाशिक : विकासकामांसाठी निधी नसल्याने कर्ज काढण्याची तयारी होत असताना दुसरीकडे सहा यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. यांत्रिकी झाडूची पाहणी करण्यासाठी देशात स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम आलेल्या इंदूर शहरातील झाडूची पाहणी करण्यासाठी दौऱ्याचे नियोजन केले जात आहे. केंद्र सरकारकडून महापालिकेला वीस कोटींचा निधी प्राप्त झाल्याने त्यातून यांत्रिकी झाडूचे वेध पालिका प्रशासनाला लागले आहेत. 

यांत्रिकी झाडूचे वेध पालिका प्रशासनाला लागले
केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेत गेल्या वर्षी महापालिकेचा देशात अकरावा, तर राज्यात नवी मुंबई पाठोपाठ दुसरा क्रमांक आला. पहिल्या दहा शहरांमध्ये महापालिकेचा क्रमांक न येण्यामागे बांधकामाचा मलबा व धुळीचे लोट कारणीभूत ठरले असता त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनाने बांधकामांचा मलबा उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था केली आहे. तर ज्या ठिकाणी मलबा आढळून येईल तेथे संबंधित व्यक्तीला आठपट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छतेसाठी इतर उपाययोजना करणे अपेक्षित असताना प्रशासनासह सत्ताधारी भाजपला यांत्रिकी झाडूचे वेध लागले आहेत. महापालिकेचे सुमारे एक हजार ७५०, खासगी मक्तेदाराचे सातशे कर्मचारी स्वच्छतेसाठी असताना कुठल्याही शहरात यांत्रिकी झाडूचा अयशस्वी प्रयोग नाशिक शहरात राबविण्याच्या होणाऱ्या प्रयत्नांबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

हवा गुणवत्ता सुधार निधीचा अपव्यय 
केंद्र सरकारने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नाशिक महापालिकेला वीस कोटींचा निधी देऊ केला आहे. या निधीतून यापूर्वीच वाहतूक बेटे सुधारणे, रस्त्यांची सुधारणा, हवामापक यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने निधी खर्च करताना नियम व अटी घालून दिल्या आहेत, असे असताना यांत्रिक झाडू खरेदी करण्यासाठी प्रयत्न होत असल्याने फक्त खर्चावरच भर दिला जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पहिल्या वर्षी एक यांत्रिक झाडू भाडेतत्त्वावर घेऊन उपयोगिता तपासली जाणार होती. परंतु, अचानक तीन यांत्रिकी झाडू खरेदीसाठी प्रयत्न होत आहेत. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

इंदूर शहरात यांत्रिकी झाडूचे काम कशा पद्धतीने सुरू आहे. त्याची उपयोगिता आहे की नाही, यासाठी पाहणीदौरा आहे. दौरा झाला म्हणजे लगेचच झाडू खरेदी करायचा नाही. गरज भासल्यास भाडेतत्त्वावर झाडू घेतला जाईल. तूर्त खरेदीचा कुठलाच विषय नाही. - सतीश कुलकर्णी, महापौर 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buy mechanical broom from nmc authorities nashik marathi news