निराधार वृद्धांना मायबाप मानणारा आधुनिक 'श्रावणबाळ"! निस्वार्थीपणाने सहा वर्षांपासून सेवा

महेंद्र महाजन
Friday, 13 November 2020

कौटुंबिक कलहातून वृद्धांना घराबाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याने आजारांशी दोन हात करत निराधारांप्रमाणे दिवस कंठावे लागतात. अशा वृद्धांना सहा वर्षांपासून आपल्या घरी आणून त्यांची सेवा करतोय

नाशिक : कौटुंबिक कलहातून वृद्धांना घराबाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याने आजारांशी दोन हात करत निराधारांप्रमाणे दिवस कंठावे लागतात. अशा वृद्धांना सहा वर्षांपासून आपल्या घरी आणून त्यांची सेवा करतोय लौकी शिरसगावचा (ता. येवला) तरुण शेतकरी नवनाथ जऱ्हाड. तेही कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. सेवाकार्यात कसल्याही प्रकारचे अनुदान घेतलेले नाही. उलटपक्षी समाजाच्या सहभागातून सेवेचा विस्तार केलाय. 

लौकी शिरसगावचा नवनाथ जऱ्हाड 
लासलगाव ही जवळची बाजारपेठ असल्याने नवनाथचे तेथे जाणे-येणे असते. त्या वेळी त्याला आसाममधील वृद्ध महिला आठ ते दहा दिवसांपासून रस्त्यावर राहत असल्याचे दिसले. गावातील लोक तिला जेवण देत; पण रस्त्यावर असल्याने अपघात होण्याची शक्यता होती. ती वेडसर असल्याने बोलत नव्हती. नवनाथने लोकांच्या सहकाऱ्यांनी तिला घरी आणले आणि सेवा सुरू केली. नवनाथकडे आता नऊ महिला व एक पुरुष आहे. त्यांचे वय सत्तरीच्या आसपास आहे. या सर्वांना जेवण, औषध देण्यापासून आंघोळ घालण्याचे काम तोच करतो. त्याचे हे काम पाहून गावातील लोकांनी त्याला एक शेड बांधून दिले. नवनाथने आपल्या शेतातील २७ गुंठे जागा सेवेच्या कामासाठी बाजूला केली. तेथे वृद्धाश्रम सुरू केला. शेतातील उत्पन्नातून तो त्या वृद्धांचा सांभाळ करत आहे. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

अनुदान न घेता समाजाच्या सहभागातून सेवेचा विस्तार 
नवनाथचे काम पाहून मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. लासलगावमधील अजय धनवट, कल्पना परब आणि संजय बिरार हे त्याच्या मागे उभे राहिले. माजी आमदार मारोतराव पवार यांनी एक जीप वृद्धांना आणण्यासाठी दिली. लासलगावमधील राजे छत्रपती प्रतिष्ठान या कामात त्याला मदत करू लागले. एका छोट्या गावात सरकारी कोणतेही अनुदान न घेता एक चांगले काम सुरू आहे. या आश्रमाला ‘सैंगऋषी वृद्धाश्रम’ असे नाव देण्यात आले. 

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

 

वृद्धांवर वाईट वेळ येऊ नये, असे मला वाटते. ज्या मायबापाने मुलांना सांभाळून पायावर उभे केले, तीच मुले असे कसे करतात? हेच समजत नाही. मी माझे पूर्ण आयुष्य अशा ज्येष्ठांसाठी समर्पित केले आहे. अनेकजण त्यासाठी मदत करतात. - नवनाथ जऱ्हाड (शेतकरी)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caring for the destitute elderly nashik marathi news