जायखेड्यात द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची फसवणूक; गुन्हा दाखल 

मनोहर शेवाळे
Friday, 30 October 2020

चेक बँकेत जमा केले असता, दोन्ही चेक बाउन्स झाले. ही गोष्ट व्यापारी शहा यांना कळवत उर्वरित पैशांची मागणी केली. पण शहा यांनी आज देतो, उद्या देतो असे सांगून टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली.

नाशिक/जायखेडा : निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत काबाडकष्ट करून पिकविलेल्या शेतकऱ्याच्या द्राक्षांची खरेदी करून दोन लाख बासष्ट हजार रुपयांचा धनादेश न वटल्याने जायखेडा पोलीस ठाण्यात द्राक्ष व्यापाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खिरमणी (ता. बागलाण) येथील धर्मा निंबाजी भदाणे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये द्राक्ष व्यापारी तनविर शहा (रा. चांदवड) या व्यापाऱ्याला सात टन द्राक्ष दिले. या द्राक्षाचे एकूण दोन लाख सत्यांशी हजार रुपये झाले. त्यात शहा यांनी भदाणे यांना पंचवीस हजार रुपये रोख व उर्वरित रकमेचा एच.डी.एफ.सी या बँकेचा खाते क्रमांक ५०२०००३३९७४१८१ चा दोन लाख रुपयांचा एक व बासष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये असे दोन चेक दिले. भदाणे यांनी दोन्ही चेक बँकेत जमा केले असता, दोन्ही चेक बाउन्स झाले. ही गोष्ट व्यापारी शहा यांना कळवत उर्वरित पैशांची मागणी केली. पण शहा यांनी आज देतो, उद्या देतो असे सांगून टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे भदाणे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गुरुवारी (ता.२९) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case has been registered against the grape trader nashik marathi news