अखेर 'त्या' उपनिरीक्षकाच्या आत्महत्येचे गूढ उलगडलेच...कारण वाचून व्हाल थक्क..

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 July 2020

येथील शहर उपअधीक्षक कार्यालयातील वाचक उपनिरीक्षक अजहर शेख (वय ३५) यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याप्रकरणी तब्बल साडेतीन महिन्यांनंतर पत्नी मिसबा अजहर शेख हिच्यासह सासू, सासरे, शालक अशा १५ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिक : (मालेगाव) येथील शहर उपअधीक्षक कार्यालयातील वाचक उपनिरीक्षक अजहर शेख (वय ३५) यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याप्रकरणी तब्बल साडेतीन महिन्यांनंतर पत्नी मिसबा अजहर शेख हिच्यासह सासू, सासरे, शालक अशा १५ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

असा आहे प्रकार

गेल्या ११ एप्रिलला शेख यांनी नियंत्रण कक्ष आवारात जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नव्हते. यानंतर उपनिरीक्षक शेख यांची पत्नी मिसबा व तिचे कुटुंबीय यापूर्वी शेख यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यातील खर्च, वकिलाची फी, तसेच या गुन्ह्यातील संशयित असलेला मिसबाचा भाऊ अनिस शेख याच्या कॅन्सरच्या उपचारासाठी वारंवार सात लाख रुपयांची मागणी करीत होते. पैसे न दिल्यास मिसबाचे कुटुंब मिसबाला ‘तू उपनिरीक्षक व त्याच्या कुटुंबीयांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेव, गळफास घेऊन घे’ अशी वारंवार धमकी देत होते. यामुळेच अजहर शेख यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे वडील हुसनोद्दीन कादर शेख (वय ५९, रा. जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

हुसनोद्दीन शेख यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक अजहर यांची पत्नी मिसबा, सासरे एकबाल शेख, रिजवान शेख, शोएब शेख, रमीज सय्यद, मोईन सय्यद, अनिस शेख, फरहान शेख, आफान शेख, यास्मीन शेख, शाकीर शेख, साबेर शेख, परवीन सय्यद, अनम सय्यद, मोनीस शेख (सर्व रा. जळगाव) या १५ जणांविरुद्ध संगनमताने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 हेही वाचा > VIDEO : बघ्यांची भरलेली जत्रा बघताच बिबट्या बिथरतो तेव्हा....काय घडले?

कौटुंबिक कलहाने घेतला बळी

उपनिरीक्षक शेख शहर पाेलिस ठाण्यात नेमणुकीस हाेते. कर्तव्यदक्ष, कामाची धडाडी, हसतमुख स्वभाव व खेळाडू असल्याने त्यांची उपअधीक्षकांचे वाचक उपनिरीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. कोरोना संसर्ग, लॉकडाउन, संचारबंदी, शब-ए-बारात या काळात त्यांनी चार दिवस सतत काम केले. शहरातील परिस्थिती व संचारबंदीबाबत पोलिसांच्या उपाययोजना, रणनीती, बंदोबस्त या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्याच वेळी कौटुंबिक कलहातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात होते. चौकशीत ते स्पष्ट झाले. टोकाच्या कौटुंबिक कलहाने एका धडाडीच्या अधिकाऱ्याचा बळी घेतला.

 हेही वाचा > कोरोनाचा भयानक काळ...अशातही 'तिने' क्षणाचाही विलंब न लावता दिला पार्थिवाला खांदा! काय घडले वाचा

(संपादन - किशोरी वाघ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the case of the sub-inspector's suicide Crime against fifteen people including his wife nashik marathi news