घरातच साजरी करा 'ईद-ए-मिलाद', शहर-ए-खतीब यांचे आवाहन; जुलूसही रद्द 

युनूस शेख
Thursday, 29 October 2020

सुमारे शंभर ते दीडशे वर्षांपासून काढण्यात येणारा जुलूस यंदा प्रथमच रद्द करण्यात आला आहे.

जुने नाशिक : हजरत मुहंमद पैगंबर जयंती अर्थात ईद-ए-मिलाद शुक्रवारी (ता. ३०) साजरी होणार आहे. शासनाच्या नियमांनुसार, मुस्लिम बांधवांनी घरात धार्मिक विधी करत ईद साजरी करण्याचे आवाहन शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांनी केले. सुमारे शंभर ते दीडशे वर्षांपासून काढण्यात येणारा जुलूस यंदा प्रथमच रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

जुने नाशिक, वडाळासह शहरातील अन्य मुस्लिमबहुल भागात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. घर, परिसर तसेच दर्गा, मशिदीसह विविध धार्मिक स्थळांच्या रोषणाईसह झेंडे, पताकांनी सजावट करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने ईद साजरी करावी, असे आवाहन खतीब यांनी केले. घरातच फातेहा पठण, कुरआन ख्वॉनी करावी, रस्ते आणि धार्मिक स्थळ आणि कब्रस्तानमध्ये गर्दी करू नये, असे त्यांनी सांगितले. जुलूसच्या पारंपरिक मार्गाची सजावट करण्यात आली आहे. घरोघरी खीर-पुरी तयार करून फातेहा पठण होणार आहे. मुस्लिम बांधवांसाठी शुक्रवारचा दिवस ईदपेक्षा कमी नसतो. अशा पवित्र दिवशीच ईद-ए-मिलाद साजरी होत असल्याने एकाच दिवशी दोन ईद साजरी करण्याचा योग आला आहे. ईदच्या पूर्वसंध्येला गुरुवारी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. जुलूसची आठवण म्हणून यापूर्वी काढण्यात आलेल्या जुलूसची चित्रफीत, छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate Eid-e-Milad at home nashik marathi news