अडवलेल्या कांद्याच्या निर्यातीला केंद्राचा हिरवा कंदील! देशांतर्गत भाव कोसळण्याचा प्रश्‍न लागला मार्गी 

महेंद्र महाजन
Saturday, 19 September 2020

कांदा निर्यातबंदीचा अचानक घेतलेला निर्णय आणि तत्पूर्वी ‘कस्टम’ने बंदरासह बांगलादेश, नेपाळ, भूतानच्या सीमेवर अडवलेला कांदा यामुळे केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सलग दोन दिवस कांदा निर्यातबंदीच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या भडक्याबरोबर निर्यातदारांच्या संघटनेने केंद्राच्या निर्यातबंदीच्या अगोदर कंटेनर अडवण्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

नाशिक : कांदा निर्यातबंदीचा अचानक घेतलेला निर्णय आणि तत्पूर्वी ‘कस्टम’ने बंदरासह बांगलादेश, नेपाळ, भूतानच्या सीमेवर अडवलेला कांदा यामुळे केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सलग दोन दिवस कांदा निर्यातबंदीच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या भडक्याबरोबर निर्यातदारांच्या संघटनेने केंद्राच्या निर्यातबंदीच्या अगोदर कंटेनर अडवण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचा परिपाक म्हणजे, बंदर अन्‌ सीमेवर अडकवलेल्या कांद्याच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती शुक्रवारी (ता. १८) रात्री निर्यातदारांपर्यंत पोचली. 

अडवलेल्या कांद्याच्या निर्यातीला केंद्राचा हिरवा कंदील 

निर्यातबंदीच्या निर्णयामध्ये सीमावर्ती भाग आणि बंदरात अडकलेला कांदा बसत नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही करावी, असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातून पाठविण्यात आलेल्या मेलमध्ये नमूद करण्यात आल्याचे निर्यातदारांनी सांगितले. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या बंदरात चार लाख टन आणि सीमा भागात ५०० ट्रकभर कांदा असल्याची माहिती दिली होती. निर्यातदारांच्या माहितीनुसार ६० कोटींचा कांदा ‘कस्टम’तर्फे अडविण्यात आला होता.

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

देशांतर्गत भाव कोसळण्याचा प्रश्‍न लागला मार्गी 

वाणिज्य मंत्रालयाच्या मेलची माहिती मिळताच, निर्यातदारांनी मुंबईच्या बंदरात कंटेनर जहाजामध्ये भरण्यासंबंधीचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी ‘कस्टम’ची मान्यता मिळालेला की ‘शिपिंग’चे बिल झालेला कांदा निर्यातीसाठी रवाना होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. दुसरीकडे मात्र ‘कस्टम’चे वरिष्ठ अधिकारी शनिवारी (ता. १९) कार्यालयीन वेळेत आल्यावर पुढील कार्यवाही सुरू होण्याची शक्यता निर्यातदारांना वाटते आहे. केंद्राने बंदर आणि सीमावर्ती भागात अडकवलेल्या कांद्याच्या निर्यातीला तयारी दर्शविल्याने देशांतर्गत भाव कोसळण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

केंद्राने मागविली माहिती 
‘कस्टम’ने निर्यातबंदीची अधिसूचना निघण्यापूर्वी कांद्याचे कंटेनर आणि ट्रक अडविल्याने कांद्याचे नुकसान होण्याची भीती बळावली होती. शिवाय कांद्याच्या आगारात आंदोलन थांबण्याचे नाव घेत नसल्याने ‘कस्टम’ने अडवलेल्या कांद्याची माहिती केंद्राने मागवल्याचे निर्यातदारांना समजले होते. त्यानुसार माहिती पाठविण्यात आल्याने गुरुवारी (ता. १७) आणि शुक्रवारी (ता. १८) सकाळपासून निर्यातीचा मार्ग मोकळा होण्याची उत्सुकता निर्यातदारांमध्ये होती. विशेष म्हणजे, कांदा निर्यातबंदीची अधिसूचना निघण्यापूर्वी जहाजामध्ये भरण्यात आलेले कंटेनर उतरविण्यात आल्याची माहिती मिळाल्याने निर्यातदारांच्या तोंडचे पाणी पळाले होते. निर्यातबंदीनंतर दुसऱ्या दिवशी कांद्याचे भाव कोसळले होते. त्यानंतर मात्र भावाचा आलेख उंचावत निघाला आहे. पण, निर्यातीसाठी रवाना झालेला कांदा पुन्हा बाजारात आला असता, तर तो कांदा संपेपर्यंत भाव घसरण्याची भीती वर्तविण्यात येत होती.  

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central government green signal on blocked onion exports nashik marathi news