विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! सीईटी परीक्षा पुढील महिन्यात होणार; वेळापत्रक जाहीर

अरुण मलाणी
Thursday, 24 September 2020

संबंधित सीईटी परीक्षांसाठी अर्ज केलेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या लॉगइन आयडी व पासवर्डच्‍या सहाय्याने प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्‍ध करून दिले आहे. प्रामुख्याने शिक्षणशास्‍त्र व विधीसह हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरींग टेक्‍नॉलॉजीच्‍या पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा समावेश आहे. 

नाशिक : कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे बारगळलेल्‍या विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रियांना गती प्राप्त होत आहे. राज्‍यस्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये घेतली जाणार आहे. राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

शिक्षणशास्‍त्र, विधी अभ्यासक्रमांच्‍या परीक्षांचा समावेश 

यापूर्वी सीईटी सेलतर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र व बी. एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षेच्‍या तारखेची घोषणा केली आहे. त्‍यापाठोपाठ फाइन आर्ट अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षेच्‍या तारखांबाबतही माहिती जारी केली. आणखी काही अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षेच्‍या तारखा जारी केल्या आहेत. संबंधित सीईटी परीक्षांसाठी अर्ज केलेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या लॉगइन आयडी व पासवर्डच्‍या सहाय्याने प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्‍ध करून दिले आहे. प्रामुख्याने शिक्षणशास्‍त्र व विधीसह हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरींग टेक्‍नॉलॉजीच्‍या पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा समावेश आहे. 

आवश्‍यक सूचना प्रवेशपत्रावर नमूद 

सध्याचे कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्व परीक्षांच्‍या आयोजनावेळी आवश्‍यक सावधगिरी बाळगली जाणार आहे. परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून, सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करण्यासह अन्‍य उपाययोजना केल्‍या जातील. तसेच विद्यार्थ्यांसाठीच्‍या आवश्‍यक सूचना प्रवेशपत्रावर नमूद केले असल्‍याचेही सीईटी सेलतर्फे कळविले आहे. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

असे आहे परीक्षांचे वेळापत्रक (कंसात अभ्यासक्रमाचे नाव)

३ ऑक्‍टोबर 

एमएएच-एम.आर्क.सीईटी (आर्किटेक्‍चर पदव्‍युत्तर पदवी) 
एमएएच-एम.एचएमसीटी-सीईटी (हॉटेल मॅनेजमेंट पदव्‍युत्तर पदवी ) 
एमएएच- एम.पी.एड. सीईटी (फिल्‍ड टेस्‍ट ४ ते ७ ऑक्‍टोबर) (शिक्षणशास्‍त्र) 
एमएएच-एम.एड. सीईटी (शिक्षणशास्‍त्र, पदव्‍युत्तर पदवी) 

१० ऑक्‍टोबर 

एमएएच-एमसीए-सीईटी (एमसीए-पदव्‍युत्तर पदवी) 
एमएएच-बी.एचएमसीटी-सीईटी (हॉटेल मॅनेजमेंट पदवी) 
एमएएच-बी.एड एम.एड. सीईटी (शिक्षणशास्‍त्र पदवी व पदव्‍युत्तर पदवी) 

११ ऑक्‍टोबर

एमएएच-एलएलबी (५ वर्षे) सीईटी (विधी अभ्यासक्रम, बारावीनंतर पदवी) 
एमएएच-बी.ए./बी.एस्सी बी.एड. (इंटिग्रेटेड) (शिक्षणशास्‍त्र) 
एमएएच-बी.पी.एड. सीईटी (फिल्‍ड टेस्‍ट १२ ते १६ ऑक्‍टो.)  

हेही वाचा >  सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CET exam next month, schedule announced nashik marathi news