सभापतिपदाच्या सत्तानाट्यात भुजबळांनी तारले आघाडीला! 

chhagan-bhujbal-098.jpg
chhagan-bhujbal-098.jpg

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदावर शिवसेना-राष्ट्रवादीने बाजी मारल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी कॉंग्रेस अन्‌ मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला संधी देण्याचा आग्रह राष्ट्रवादीने धरला. मात्र शिवसेनेने एक सभापतिपद राष्ट्रवादीला व उरलेली तीन सभापतिपदे स्वकीयांना देण्याची भूमिका घेतली. त्यावर तणातणी सुरू झाल्यावर ग्रामविकासमंत्री छगन भुजबळांनी आघाडीला तारले. 

 समन्वयकाची भूमिका 

महाविकास आघाडीच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येकी एक सभापतिपद द्यायचे. त्याचे सूत्र म्हणजे, शिवसेनेच्या कोट्यातून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला, तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून कॉंग्रेसला एक पद असे होते. राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी हा प्रस्ताव अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादीचे सदस्य हॉटेल एक्‍स्प्रेस इनमध्ये पोचल्यावर आघाडीच्या कोअर कमिटी बैठकीत ठेवला. मात्र शिवसेना स्वतःला तीन, तर राष्ट्रवादीला एक सभापतिपदाच्या पुढे सरकायला तयार नव्हती. अर्थ व बांधकाम सभापतिपद देण्यास शिवसेना तयार होईना. परिणामी, गुरुवारी (ता. 2) रात्री चर्चा फिसकटली. शुक्रवारी (ता. 3) सकाळी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी थेट भुजबळ फार्म गाठले. शिवसेनेच्या भूमिकेच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने कॉंग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भाजप अशी मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या. अगोदरच भाजपने सत्तेसाठीची राष्ट्रवादीला "ऑफर' दिली होती. त्याची कुणकुण लागताच, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, सुहास कांदे आदी भुजबळ फार्मवर पोचले. 


भुजबळ फार्मवर खलबते 
शिवसेनेचे नेते पोचल्यावर भुजबळ फार्मवर आघाडीच्या सत्ताकारणाची खलबते सुरू झाली. शिवसेनेच्या एका आमदाराने अपक्ष शंकरराव धनवटे यांचे नाव धरले असताना श्री. भुजबळ यांनी निर्णायक भूमिका घेत शिवसेनेच्या सुरेखा दराडे यांच्या नावाला अनुकूलता दर्शवत आघाडीचा धर्म पाळण्यासाठी कॉंग्रेसच्या अश्‍विनी आहेर यांच्या नावाला सहमती दर्शविली. दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत आलबेल स्थिती नव्हती. सत्तेत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला सामावून घेण्याबद्दलचा विरोध वाढत होता. त्याच वेळी येवला तालुक्‍यात दोन सभापतिपदे देण्यास हरकत घेण्यात आली. शिवाय सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार ऍड. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या तथा भाजपच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्यासाठी कोकाटे समर्थक आग्रही राहिले. राजकीय विसंवादाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशी मोट बांधली गेल्याने आघाडीचा सत्तेत बाजी मारण्याचा आत्मविश्‍वास दुणावला गेला. त्यामुळे अपक्ष व सीमंतिनी कोकाटेंच्या समर्थनाप्रमाणे, येवल्यातील दुसऱ्या सभापतिपदाचा मुद्दा गळून पडला. 

हेही वाचा > माणिकराव शिंदे यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी...कारण...  
भाजपने घेतला पायावर धोंडा पाडून 
शिवसेना-राष्ट्रवादीमधील तणातणी आणि राष्ट्रवादीकडून सुरू झालेल्या संवादाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने सभापतिपदांची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी स्पष्ट बहुमत असताना घोडेबाजार व्हायला नको म्हणून माघार घेणाऱ्या भाजपचा निवडणुकीचा आग्रह शुक्रवारी राहिला. गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्याप्रमाणे सीमंतिनी कोकाटे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले. कोकाटेंच्या उमेदवारीमुळे आघाडीमध्ये चलबिचल होणार काय, अशी स्थिती तयार झाली होती. मात्र किरकोळ कुरबुरीच्या पलीकडे आघाडी बहुमतापेक्षा अधिक संख्याबळ मिळविण्यात यशस्वी झाल्याने भाजपने पायावर धोंडा पाडून घेतला असे राजकीय वातावरण पाहायला मिळाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com