कोरोनामुळे सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सव रद्द; सलग दुसऱ्या वर्षीही खंडित होणार परंपरा

Chaitrotsav at Saptashrungi gadh canceled due to rising corona Nashik Marathi News
Chaitrotsav at Saptashrungi gadh canceled due to rising corona Nashik Marathi News

वणी (जि. नाशिक) : राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावांतर्गत उपाययोजना करण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चैन’अंतर्गत ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद केल्याने साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगीमातेच्या चैत्रात्सव यात्रेस सलग दुसऱ्या वर्षी भाविकांना मुकावे लागणार आहे. तर यात्रेवर अवलंबून असलेल्या व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

आदिमाया सप्तशृंगीचा वर्षाभरातील वेगवेगळ्या उत्सवांपैकी एक प्रमुख उत्सव असलेल्या चैत्रोत्सव २१ ते २७ एप्रिलदरम्यान होत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव रद्द झाला आहे. मागील वर्षी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून प्रशासनाने ११ मार्चपासून मंदिरे दर्शनासाठी बंद केल्याने तेव्हाही चैत्रोत्सव रद्द केला होता. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनतर १६ नोव्हेंबर २०२० रोजी अटी-शर्ती व कोविड नियमांचे पालन करून मंदिर भाविकांना खुले केले होते. यात १७ ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव व कावडयात्रादेखील रद्द करण्यात आली होती. दर वर्षी चैत्रोत्सवासाठी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व इतर राज्यांतून सुमारे दहा लाखांवर भाविक हजेरी लावतात. यात खानदेशातून तीन ते चार लाख भाविक दर वर्षी पदयात्रेने येण्याची परंपरा होती. ती सलग दुसऱ्या वर्षीही खंडित होणार आहे. 

ऑनलाइन दर्शनाची सुविधा 

आदिमायेचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी आदिमायेची नित्य दैनंदिन पूजाविधी सुरू असून, आदिमायेचे घरबसल्या दर्शन व्हावे, यासाठी लाइव्ह ऑनलाइन दर्शन सुविधा ट्रस्टच्या वेबसाईट व सोशल मीडियाच्या माध्यमातून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने अगोदरपासूनच उपलब्ध करून दिली आहे. तसेच व्हॉट्सअॅप, फेसबुकद्वारे आदिमायेच्या मूर्तीचा दररोजचा फोटो नियमित प्रसारित करण्यात येतो. राज्यातील व जिल्ह्यातील वाढती कोविड संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन भाविकांनी स्वतःच्या व कुटुंबीयांच्या सुरक्षितेसाठी घरात बसूनच आदिमायेचे दर्शन घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

देवस्थानाला २५ ते ३० कोटींचा फटका 

सुमारे चार हजार ५०० लोकसंख्या असलेल्या सप्तशृंगीगडावर शेती व औद्योगिक क्षेत्र नसल्याने नारळ, प्रसाद, कुंकू, हार, खेळणी व कटलरी, हॉटेल, लॉजिंग या भाविकांशी निगडित असलेल्या घटकांवर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मागील वर्षीचा चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव, तसेच उन्हाळी व दिवाळी सुटीतील अर्थप्राप्तीच्या कालावधीत मंदिर बंद असल्याने सुमारे पंचवीस ते तीस कोटींचा फटका बसला होता. त्यातून काहीसे सावरत असताना पुन्हा एकदा चैत्रोत्सवात देवालय बंद झाल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com