शेतकरी विवंचनेत; जमिनीची सुपिकता टिकविण्याचे आव्हान

संदीप पाटील
Saturday, 3 October 2020

सततच्या ओलाव्यामुळे पिकांची वाढच खुंटली असून, अतिवृष्टीत वाऱ्यानेही जोर पकडल्याने शेतातील पिके भूईसपाट झाली. महागडी कांदे बियाणे पावसाच्या माराने व प्रवाहाने वाहून गेले. कांदालागवड करूनही रोपे वाहून गेली किंवा लागवड पातळ झाली आहे.

विराणे (जि.नाशिक) : जून महिन्याच्या सुरवातीपासून यंदा पावसाने मालेगाव तालुक्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आनंदी होते. तालुकाभरात खरिपाची पेरणीही वेळेवर झाली. वेळोवेळी झालेल्या पावसामुळे पीकही जोमात होते. यावर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व अतिवृष्टीचे विरजन पडले. अतिपावसामुळे बांध, बंधारे फुटून तालुक्यातील अनेक गावांत शेतातील वरच्या मातीचे थरच वाहून गेल्याने आता सततच्या ओलाव्यामुळे अनेक वर्षांपासून खतपाणी घालून टिकवलेली जमिनीची सुपिकता टिकविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. 

आजही विवंचनेत शेतकरी
जूलैपर्यंत पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. ऑगस्टचा उत्तरार्ध व सप्टेंबर महिन्यात पावसाने तांडवच केले. परिसरात सतत पाऊस, अतिवृष्टी चालूच होती. १५ ते २० दिवस सूर्यदर्शन दुर्लभ होऊन नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत होते. ऑगस्ट महिन्यातच अनेक धरणे शंभर टक्के भरली. शेताशेतांत पाणी साचले. त्यामुळे शेतातून पाणी कसे काढावे, या विवंचनेत शेतकरी आजही आहेत. शिवाररस्तेही वाहून गेले असून, जमिनीत पूर्णपणे खारवा निर्माण झाला आहे. 

शेतातील पिके भूईसपाट
सततच्या ओलाव्यामुळे पिकांची वाढच खुंटली असून, अतिवृष्टीत वाऱ्यानेही जोर पकडल्याने शेतातील पिके भूईसपाट झाली. महागडी कांदे बियाणे पावसाच्या माराने व प्रवाहाने वाहून गेले. कांदालागवड करूनही रोपे वाहून गेली किंवा लागवड पातळ झाली आहे. खरीप पिकांसोबतच हुकमाचे नगदी पीकच आज धोक्यात आले आहे. तसेच दुसऱ्याच्या शेतात पाणी काढले तर भांडणाचा मार्ग म्हणून शेतकरी हतबल झाले आहेत. 

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

काटवन, माळमाथ्यावर फटका 
तालुक्यातील काटवन व माळमाथ्यावर अतिपावसाचा फटका बसला. काटवनमधील कमळदरा धरण फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. तालुक्यातील दक्षिण भागातील दाभाडी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीला फटका बसला. काही ठिकाणी विहिरी दोन महिन्यांपासून तुडुंब भरल्या आहेत. त्यांचे पाणी सातत्याने शेतात वाहत असल्याने माती वाहून जात आहे.  

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

 

अतिवृष्टी, सततचा ओलावा, अनियमित पाऊस, महागडी बियाणे, मजुरी, मशागत खर्च, मेहनत, कमी भाव यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. हमीभाव, पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी. -बन्सीलाल कचवे, शेतकरी, करंजगव्हाण 
 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: challenge of maintaining soil fertility nashik marathi news