VIDEO : अशी कशी नियतीची खेळी?...काढणीला आलेलं उभे पीक काही वेळातच खाक!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

वेळ कशी पालटेल हे सांगताच येणार नाही. आधीच लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास कोरोनाने हिसकावला अन् त्यात संकट काही थांबायचं नाव घेईना...अवघ्या एका दिवसावर तोडणीस आलेल्या पिकाला डोळ्यासमोर उद्ध्वस्त होतांनाचा प्रसंग पहाण्याची वेळ चांदोरी (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांवर आली...

नाशिक : वेळ कशी पालटेल हे सांगताच येणार नाही. आधीच लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास कोरोनाने हिसकावला अन् त्यात संकट काही थांबायचं नाव घेईना...अवघ्या एका दिवसावर तोडणीस आलेल्या पिकाला डोळ्यासमोर उद्ध्वस्त होतांनाचा प्रसंग पहाण्याची वेळ चांदोरी (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांवर आली...अन् नियतीचे घाव थेट त्या शेतकऱ्याच्या मेहनतीवर झाल्याने त्या शेतकऱ्याने एकच आक्रोश केला...

अशी घडली घटना

सुकेणा रोड भागातील शेतकऱ्याच्या ऊसास वीजवाहक तारांमुळेच उसाला आग लागल्याचा आरोपही या शेतकऱ्यांनी केला आहे. चांदोरी येथील संपत आहेर यांचा गट नंबर 865 अडीच बिघे, निवृत्ती आहेर गट नंबर 866 तीन बिघे, इंदूबाई गडाख गट नंबर 855 तीन बिघे, पुष्कर भन्साळी गट नंबर 873 चार बिघे या शेतकऱ्यांचा उस व तुषार खरात यांची द्राक्ष बाग आहे. बुधवारी (ता.27) दुपारी दोनच्या उसाच्या क्षेत्रावरून गेलेल्या वीजवाहक तारामधून ठिणग्या निघाल्या. या ठिणग्या ऊसाच्या शेतात पडल्याने उसाने पेट घेतला. यात सोसाट्याचा वारा वाहत असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. यामुळे ऊसा शेजारी असलेल्या तुषार खरात या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या द्राक्षबागेतही आग पोहचली. ही घटना तत्काळ लक्षात आल्याने शेतकरी व नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामुळे इतर उसाच्या पिकास आग लागली नाही. 

लॉकडाउनचा असाही फटका 

जळालेल्या दहा एकर क्षेत्रांपैकी आठ एकर क्षेत्रावरील ऊस तोडणीला आलेला होता. लॉकडाउन असल्याने रसवंती बंद होती, उद्यापासून त्या उसाची तोडणी चालू करायची होती. मात्र त्यापूर्वीच शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तसेच तुषार खरात यांची द्राक्षबाग लॉकडाउनच्या काळात पाच रुपये किलोने देऊन नुकसान झाले. त्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने दुहेरी संकट निर्माण झाले आहे. 

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे आग लागून लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. - तुषार खरात, (शेतकरी) 

महावितरणने पावसाळ्यापूर्वी चांदोरी शिवारातील खाली आलेल्या तारांचा प्रश्‍न निकाली काढावा अन्यथा अशी परिस्थिती इतरत्रही निर्माण होऊ शकते. - शिरीष गडाख, उपसरपंच (चांदोरी ग्रामपालिका )

हेही वाचा > नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी..इथेही मालेगाव कनेक्शन

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Chandori, a farmer lost millions, ten acres of sugarcane Burned due to short circuit nashik marathi news