डी. फार्मसीच्‍या अभ्यासक्रमात तीस वर्षांनी बदल! नवीन विषयांचा समावेश; प्राचार्य-प्राध्यापकांकडून स्‍वागत 

dpharma.jpg
dpharma.jpg

नाशिक: काळानुरूप सर्वच शाखांच्‍या अभ्यासक्रमात बदल होणे अपेक्षित असते. त्‍याप्रमाणे डी. फार्मसी या औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रमात तब्‍बल तीस वर्षांनी बदल होत आहे. या बदललेल्‍या अभ्यासक्रमाचे प्राचार्य व प्राध्यापकांनी स्वागत केले आहे. नवीन विषयांचा समावेश, तसेच अभ्यासक्रम रुग्णाच्या हिताच्‍या अनुषंगाने तयार केलेला असल्‍याने या अभ्यासक्रमामुळे सकारात्‍मक बदल घडून येतील, असा विश्र्वास व्‍यक्‍त केला जात आहे. 

डी. फार्मसीच्‍या अभ्यासक्रमात तीस वर्षांनी बदल!
फार्मसी कौन्‍सिल ऑफ इंडिया (पीसीआय)तर्फे यासंदर्भात या शुक्रवारी (ता. १६) अधिसूचना जारी केली आहे. अभ्यासक्रमात बदलाकरिता संसदेची परवानगी घेणे बंधनकारक असताना, गेल्‍या अनेक वर्षांपासून या प्रक्रियेमुळे अभ्यासक्रमात अपेक्षित बदल झालेला नव्‍हता. परंतु बदलत्‍या परिस्थितीनुसार अखेर अभ्यासक्रमातही बदल करण्यात आला आहे. 

प्राचार्य-प्राध्यापकांकडून स्‍वागत,
प्रसिद्ध केलेल्‍या अधिसूचनेत प्रवेशाची पात्रता, अभ्यासक्रमातील विषयांचा तपशील, अध्ययन कालावधीची माहिती, परीक्षा पद्धती, प्राध्यापकांची अर्हता यांसह अन्‍य सविस्‍तर तपशील दिलेला आहे. गेल्‍या काही वर्षांमध्ये औषधनिर्माणशास्‍त्र शाखेत झालेल्‍या बदलांची दखल घेत, या अभ्यासक्रमातही सुधारणा करण्यात आल्‍या आहेत. केवळ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नव्‍हे, तर आधुनिक ज्ञान ग्रहण केलेले फार्मसीस्‍ट भविष्यात घडणार असल्‍याने रुग्‍णांनादेखील अप्रत्यक्षरीत्या या शिक्षणक्रमाचा लाभ होणार आहे. 

काही नवीन विषयांचा समावेश 
प्रथम वर्षात यापूर्वी फार्मसीटिक्‍स भाग एक आणि दोन स्‍वतंत्र होते. नवीन शिक्षणक्रमात ते एक केले आहेत. सोशल फार्मसी या नवीन विषयाचा समावेश केला आहे. फार्मासिटीकल केमिट्री, फार्माकोग्‍नसी, ॲनॉटॉमी फिजिओलॉजी या विषयांमध्ये आवश्‍यक सुधारणा केल्‍या आहेत. द्वितीय वर्षात कम्‍युनिटी फार्मसी ॲन्ड मॅनेजमेंट, फार्मेकॉथेरीपिस्‍ट या विषयांची भर घातली असून, फार्मकॉलॉजी, फॉर्मसी लॉ ॲन्ड इथिक्‍स या विषयांच्‍या जोडीला हॉस्‍पिटल ॲन्ड क्‍लिनिकल फार्मसी हे विषय शिकविले जाणार आहेत. 


औषधनिर्माणशास्‍त्र शाखेच्‍या अभ्यासक्रमात बदल व्‍हावा, अशी प्राचार्य व प्राध्यापकांची खूप आधीपासून मागणी होती. या नवीन अभ्यासक्रमामुळे शिक्षणाची गुणवत्ता उंचावणार असून, चांगले करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना फायदा होईल. कौशल्‍याभिमुख, उद्योजकतेला यातून चालना मिळणार असून, फार्मासिस्‍टची जबाबदारीदेखील वाढणार आहे. -प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, एमजीव्‍हीचे फार्मसी महाविद्यालय  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com