"साहेब..आमच्या बापाला वारीचे स्वप्न दाखवता..पण अशात तुम्ही जाणार का?

devendra fadnavis 1.jpg
devendra fadnavis 1.jpg

नाशिक : "..म्हणजे आमचे आईबाप वारीला जाणार, त्यात त्यांना करोना झाला की माझ्या आईबापासह लाखो शेतकर्‍याचे आईबाप कुत्र्यासारखे रस्त्यावर मरुन पडणार. राज्यसरकारने योग्य उपाय केले नाही, असं म्हणत तुम्ही सत्ता काबीज करणार. अहो,पण आमच्या लाखो बहुजनांची घरे आईबापावाचून पोरकी होतील त्याचं काय?" असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा छावा क्रांतिवीर सेनेनी जाहीर निषेध केला आहे. संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

तुम्ही देहु ते पंढरपुर वारीत सहभागी व्हाल का?

लाखो वारकर्‍यांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुर वारीत खंड पडू देणार नाही. त्यासाठी राज्य सरकारला आवश्यक त्या उपाययोजना करायला भाग पाडू, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा छावा क्रांतिवीर सेनेनी जाहीर निषेध केला आहे. फडणवीस साहेब, तुम्ही देहु ते पंढरपुर वारीत सहभागी व्हाल का? तर आम्ही तुमच्या फोटोची घरातच पूजा करु, असे जाहीर आव्हान त्यांनी दिले आहे.

काय म्हटलयं पत्रात...

छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार, कोरोनाचे संकट असले तरी पंढरपूर वारी होणार, असे तुम्ही म्हणालात, हे वाचून तुमच्यासमोर लोटांगणच घालायची इच्छा झाली. विठ्ठल आम्हा बहुजनांचं दैवत. केवळ त्याला बघण्यासाठी आमचे आईबाप उन्हातान्हात, पावसापाण्यात शेकडो किलोमीटर पायी जातात. आमच्या आईबापाला राजकारण कळत नाही साहेब. ते भोळे आहेत. त्यांच्या डोळ्यापुढे फक्त विठ्ठल असतो. वारी होणारच, असे तुम्ही म्हणाला आणि त्यांना आनंद झाला. पण, फडणवीस साहेब करोनाचे काय? तुमची चर्चा ऐकली आम्ही. राज्यसरकारला योग्य उपाययोजना करायला सांगणार, अस म्हणत तुम्ही मस्त राजकारण खेळलं आहे. म्हणजे आमचे आईबाप वारीला जाणार, त्यात त्यांना करोना झाला की माझ्या आईबापासह लाखो शेतकर्‍याचे आईबाप कुत्र्यासारखे रस्त्यावर मरुन पडणार. राज्यसरकारने योग्य उपाय केले नाही, असं म्हणत तुम्ही सत्ता काबीज करणार. अहो,पण आमच्या लाखो बहुजनांची घरे आईबापावाचून पोरकी होतील त्याचं काय? विठ्ठलावरचा आमचा विश्वास उडेल त्याचं काय?तुम्ही हसत हसत मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्याल हो साहेब. पण, आमच्या जित्राबांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारा आमचा बाप देवाघरी गेला असेल त्याचं काय?शेतातल्या काळ्या मातीवर मायेनं हात फिरवणारी आमची माय रानाला पोरकी करुन कायमची निघून गेली असेल त्याचं काय?

बापाच्या गळ्यावरुन कोरोनाची सुरी फिरवू नका

फडणवीस साहेब, वारीची परंपरा खंडीत होता कामा नये, असे तुम्ही म्हणताय तर हरकत नाही. वारीच्या आयोजकांसोबत तुम्ही देहू ते पंढरपूर पायी वारी करायलाच हवी. सोबत तुम्ही तुमचे समर्थकही न्या. आम्ही बहुजन शेतकरी प्रत्येक मुक्कामी तुमच्या पोटभर जेवणाची सोय करु. एवढेच नव्हे तर करोनाचे संकट असतानाही तुम्ही देहू ते पंढरपूर असे २३६ किलोमीटर पायी चालणार, याचा अभिमान बाळगत प्रत्येक घरात तुमचा फोटो लावू. त्याची पूजाही करु. पण, जर तुम्ही वारीत सहभागी होणार नसाल तर कृपया एसीमध्ये बसून उन्हात राबणार्‍या आमच्या बापाला वारीची स्वप्न दाखवू नका. बाप आमचा भोळा आहे, त्याच्या गळ्यावरुन करोनाची सुरी फिरवू नका, अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com