अतिक्रमणधारकांचे ‘पहिले पाढे पंचावन्न’; सुस्त कारभारामुळे अतिक्रमण विभागावर नागरिक नाराज

प्रमोद दंडगव्हाळ
Thursday, 21 January 2021

येथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची मात्र महापालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नसल्याचे दिसून आले. महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे केवळ देखावा म्हणून काय ही अतिक्रमणाची मोहीम राबविण्यात आली, असा प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत.

सिडको (नाशिक) : अतिक्रमणधारकांचे ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशीच काहीशी गत सिडकोत बघायला मिळत असल्याने महापालिका अतिक्रमण विभागाच्या सुस्त कारभाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे केवळ देखावा?

पोलिस प्रशासन व इतर काही तक्रारींचा आधार घेत मंगळवारी (ता. १९) महापालिका सिडको विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाथर्डी फाटा ते अंबड रोडवरील चायनीज व इतर हातगाड्याधारकांवर अतिक्रमणाची मोहीम राबविली. महापालिकेच्या मोहिमेबाबत सर्वत्र समाधानही व्यक्त करण्यात आले; परंतु अतिक्रमण मोहिमेस अवघे बारा तास उलटत नाहीत तोच सकाळी पुन्हा त्याच ठिकाणी हातगाड्याधारकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले. येथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची मात्र महापालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नसल्याचे दिसून आले. महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे केवळ देखावा म्हणून काय ही अतिक्रमणाची मोहीम राबविण्यात आली, असा प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे. 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

नव्या पॅटर्नची गरज 

आदल्या दिवशी अतिक्रमण केल्यानंतर पुन्हा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात नाही किंवा त्या ठिकाणी बंदोबस्तही ठेवला जात नाही. त्यामुळे पुन्हा दोन दिवसांनंतर अतिक्रमण होण्यास सुरवात होते. ही अतिक्रमण निर्मूलन विभागाची मानसिकता अतिक्रमणधारकांना समजल्याने ते पुन्हा अतिक्रमण करतात. याकरता ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. नव्हे अतिक्रमणाचा नवीन ‘पॅटर्न’ अस्तित्वात आणणे आवश्यक आहे.

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens dissatisfied with sluggish management of encroachment department nashik marathi news