'त्या' अल्पवयीन मुलीची केली प्रसूती; सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

तिने मुलाला जन्म दिला असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ही मुलगी अल्पवयीन असतानाही प्रसूतीपूर्वी किंवा प्रसूतीनंतर 'सिव्हिल'ने याबाबतची माहिती पोलिसांना का कळविली नाही, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

नाशिक : अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी दाखल होऊनही याबाबत पोलिसांना न कळविल्याने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अडचणीत आले आहे. संबंधित मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा व त्यातून ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वाचा सविस्तर प्रकार...

असा आहे प्रकार

बापासह दोघांनी अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार सिडको भागात उघडकीस आला. पीडित अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला असून, या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. लेखानगर परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या या नराधम बापासह दोघांनी केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिने मुलाला जन्म दिला असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ही मुलगी अल्पवयीन असतानाही प्रसूतीपूर्वी किंवा प्रसूतीनंतर 'सिव्हिल'ने याबाबतची माहिती पोलिसांना का कळविली नाही, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी 'सिव्हिल'कडे मागितली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने सिव्हिलच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.

'सिव्हिल'कडून प्रकार झाकण्याचा आरोप

संबंधित अल्पवयीन मुलीची प्रसूतीचा प्रकार पोलिसांना कळविण्याऐवजी झाकण्याचा प्रकार 'सिव्हिल'कडून करण्यात आल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाचे मध्य नाशिकचे अध्यक्ष दीपक डोके यांनी केला. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे चौकशीची मागणी केली आहे. तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील या प्रकरणात व्यक्तिगत लक्ष घातले असून या पीडितेस पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!

गर्भवतीला रुग्णालयात दाखल करतेवेळी तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिच्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक होते. संबंधित मुलीची माहिती आम्ही बाल कल्याण समितीला दिली आहे. पीडितेच्या आईने तिला दाखल करतेवेळी या मुलीचे वय २० सांगितले. तशी नोंद आमच्याकडे आहे. - डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

हेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Civil Hospital is in trouble for not informing police about girl nashik marathi news