esakal | ....अन् बंद पडलेली कोरोना टेस्टिंग लॅब पुन्हा सुरू.. 'इतक्या' स्वॅबचे टेस्टिंग
sakal

बोलून बातमी शोधा

corona testing.jpg

कोरोना टेस्टिंगसाठी खासगी प्रयोगशाळेचा आग्रह लोकप्रतिनिधी आणि काही अधिकाऱ्यांनी धरला होता. मात्र हा आग्रह फलद्रूप झाला नसल्याने लॅबला बाहेरून अडथळे आणले जात आहेत का, असा प्रश्‍न इथल्या नागरिकांना भेडसावू लागला आहे. लॅब सुरळीत सुरू राहील आणि याच लॅबमधील दुसरे मशिन सुरू करून अहवालांची संख्या वाढविण्यासाठीच्या अडथळ्यांचा शोध कधी घेतला जाणार, याच्या उत्तराच्या शोधात इथले नागरिक आहेत. 

....अन् बंद पडलेली कोरोना टेस्टिंग लॅब पुन्हा सुरू.. 'इतक्या' स्वॅबचे टेस्टिंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिककरांच्या पाठपुराव्यातून नाशिकमध्ये 28 एप्रिलपासून सुरू झालेली कोरोना टेस्टिंग लॅब आठ दिवसांमध्ये बंद पडली. मशिनमध्ये स्वॅब लावण्यासाठी लागणारी प्लॅस्टिक प्लेट (वेल) संपल्याने टेस्टिंग बुधवार (ता. 6)पासून बंद झाले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्याबद्दलची विचारणा केल्यावर साहित्य उपलब्ध होईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. अखेर गुरुवारी (ता. 7) सायंकाळी साडेसातला वेल पोचविण्यात आल्या आणि 90 स्वॅबचे टेस्टिंग सुरू झाले. 

पुरेशा साधनसामग्रीची तसदी प्रशासन कधी घेणार? 
मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झालेल्या लॅबची  छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाहणी केली होती. त्या वेळी लॅबमुळे कोरोना वैद्यकीय उपाययोजनांना वेग येईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. पण आठवड्यात लॅब बंद ठेवण्याची नामुष्की नाशिककरांवर आली. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला महाविद्यालयाने वेल उपलब्ध नसल्याने टेस्टिंग बंद ठेवण्यात आल्याची माहिती कळविण्यात आली. मुळातच, टेस्टिंगसाठी लागणारी साधनसामग्री महिनाभर पुरेल एवढी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती महाविद्यालयातर्फे करण्यात आली होती. पण त्याकडे फारशा गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे पुरेशी साधनसामग्री प्रशासनातर्फे नेमकी कधी उपलब्ध करून देणार, हा खरा प्रश्‍न आहे. 

संस्थेने केली खरेदी 
स्वॅबमधील स्राव शोषण्यासाठी 90 नमुन्यांच्या टेस्टिंगपूर्वी "मॅन्युअली' तीन तासांचा कालावधी लागतो. हा कालावधी ऑटोमायझेशनने कमी करणे शक्‍य आहे. मात्र त्याबद्दलचे स्वारस्य दाखविले न गेल्याने मविप्र संस्थेतर्फे त्यासंबंधीची मशिनरी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात ही मशिनरी मिळण्यासाठी किती दिवसांचा वेळ लागतो हा प्रश्‍न आहे. मात्र ही मशिनरी आल्यावर टेस्टिंगचा कालावधी कमी होण्याची शक्‍यता आहे. हे जरी एकीकडे होत असले, तरीही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे देण्यात आलेल्या टेस्टिंग मशिनचे कॅलिब्रेशन नेमके कधी होणार, याचे उत्तर शोधून सापडत नाही. 

हेही वाचा > थरारक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'

अडथळ्याचा शोध कधी घेतला जाणार? 
कोरोना टेस्टिंगसाठी खासगी प्रयोगशाळेचा आग्रह लोकप्रतिनिधी आणि काही अधिकाऱ्यांनी धरला होता. मात्र हा आग्रह फलद्रूप झाला नसल्याने लॅबला बाहेरून अडथळे आणले जात आहेत का, असा प्रश्‍न नाशिककरांना भेडसावू लागला आहे. लॅब सुरळीत सुरू राहील आणि याच लॅबमधील दुसरे मशिन सुरू करून अहवालांची संख्या वाढविण्यासाठीच्या अडथळ्यांचा शोध कधी घेतला जाणार, याच्या उत्तराच्या शोधात नाशिककर आहेत. 

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

go to top