इथेनॉल प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी कादवास सहकार्य करावे  - नरहरी झिरवाळ

संदीप मोगल
Friday, 23 October 2020

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे अध्यक्षस्थानी होते.

लखमापूर (नाशिक) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम नियोजनामुळे एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू असून, उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देत आहे. सध्या केवळ साखरनिर्मिती करून कारखाने चालणे शक्य नाही. त्यामुळेच कादवाने इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची केलेली तयारी स्वागतार्ह असून, इथेनॉल प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सर्वांनी कादवास सहकार्य करावे, असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. 

४४ व्या गळीत हंगामास सुरवात 

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे अध्यक्षस्थानी होते. आमदार दिलीप बनकर, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, राज्य सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी बाळासाहेब देशमुख प्रमुख पाहुणे होते. 
 झिरवाळ म्हणाले, की कादवा हा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तारणहार असून, चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी कादवाला प्राधान्य देत आहेत. कारखान्याच्या डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्पास आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे झिरवाळ यांनी सांगितले. तसेच सभासद शेतकरी, कामगार, अधिकारी यांनी या प्रकल्पासाठी मदत केल्यास लवकरच हा प्रकल्प उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी आमदार बनकर यांनीही मनोगत व्यक्त करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वात कोणतेही बायप्रॉडक्ट नसलेला कादवा सुरळीत सुरू असून, हा सहकारातील आदर्श असल्याचे म्हणाले. 

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

दोन हजार ५०० टन प्रतिदिन गाळपास परवानगी

शेटे यांनीही मनोगत व्यक्त करत कादवाच्या वाटचालीचा आढावा घेत कादवाने मशिनरी बदलताना आधुनिक व अधिक क्षमतेच्या टाकल्याने गाळप कार्यक्षमता वाढली असून, शासनाने दोन हजार ५०० टन प्रतिदिन गाळपास परवानगी दिली आहे. यंदा सुमारे १० हजार हेक्टर ऊस नोंद झाली असल्याने एक महिना कारखाना लवकर सुरू केला आहे. 
प्रारंभी गव्हाणपूजन होत मान्यवरांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकण्यात आली. 
या वेळी कारखाना उपाध्यक्ष उत्तम भालेराव, प्रकाश वडजे, विश्वासराव देशमुख, अनिल देशमुख, संजय पडोळ, सदाशिव शेळके, संचालक मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बापू पडोळ, दिनकर जाधव, सुनील केदार, विश्वनाथ देशमुख, शिवाजीराव बस्ते, सुकदेव जाधव, सुभाष शिंदे, कामगार युनियन अध्यक्ष दत्तात्रय वाकचौरे, संदीप शार्दूल, चंद्रकला घडवजे, शांताबाई पिंगळ, साहेबराव पाटील, संपतराव कोंड, शेखर देशमुख, बबन देशमुख, विलास वाळके, किसन भुसाळ, भास्कर भगरे, श्याम हिरे, राजेंद्र उफाडे, डॉ. योगेश गोसावी आदींसह संचालक, सभासद, शेतकरी, कामगार उपस्थित होते. संचालक शहाजी सोमवंशी यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले. प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी स्वागत केले. 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

इथेनॉल प्रकल्पासाठी एक कोटी ठेवी जमा 

इथेनॉल प्रकल्पासाठी बँक कर्ज देण्यासाठी तयार आहे मात्र त्यास काही रक्कम ही कारखान्यास अगोदर भरावी लागणार असून, त्यासाठी सर्वांनी कारखान्याकडे ठेवी ठेवाव्यात. त्यास कारखाना चांगले व्याज देईल, असे आवाहन अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले. त्यास उपस्थित सभासद, शेतकरी, कामगार, अधिकारी, माजी अधिकारी, कामगार यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठेवी ठेवण्याचे जाहीर केले आणि पहिल्याच दिवशी कारखाना पतसंस्थेत एक कोटी ठेवी जमा झाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collaborate for the completion of the ethanol project nashik marathi news