आरोग्यदायी जांभळाची वाईन बाजारात दाखल...लवकरच देशभरात उपलब्धता..वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 8 June 2020

जगातील पहिली व्यावसायिक जांभूळ वाइन साकारण्याचा प्रवास 2013 मध्ये महाबळेश्‍वरच्या जंगलापासून सुरू झाला. सह्याद्रीच्या जंगलातून जांभळाच्या स्रोतांकडून जगातील सर्वांत सुगंधी, स्वादिष्ट आणि पौष्टिक वाइन बनविण्याची त्यांची इच्छा होती. परंतु विविध आव्हानांमुळे व्यावसायिक अनावरण शक्‍य होत नव्हते.

नाशिक : आरोग्यासाठी उपयुक्‍त समजल्या जाणाऱ्या जांभळापासून विंचूर (ता. निफाड) येथे वाइननिर्मिती सुरू आहे. "रेसवेरा वाइन्स'च्या माध्यमातून जांभळाच्या वाइनचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले असून, ही आरोग्यदायी वाइन बाजारात नुकतीच दाखल झालेली आहे. लवकरच ही वाइन देशभरात उपलब्ध होईल. 

जांभळाच्या वाइनचे व्यावसायिक उत्पादन 

वाइन कॅपिटल ऑफ इंडिया ही ओळख असलेल्या नाशिकला जांभळाच्या वाइननिर्मितीचा प्रयोग पीयूष सोमाणी यांनी यशस्वी केला आहे. जगातील पहिली व्यावसायिक जांभूळ वाइन साकारण्याचा प्रवास 2013 मध्ये महाबळेश्‍वरच्या जंगलापासून सुरू झाला. सह्याद्रीच्या जंगलातून जांभळाच्या स्रोतांकडून जगातील सर्वांत सुगंधी, स्वादिष्ट आणि पौष्टिक वाइन बनविण्याची त्यांची इच्छा होती. परंतु विविध आव्हानांमुळे व्यावसायिक अनावरण शक्‍य होत नव्हते. शोधादरम्यान रेसवेराला जगातील अव्वल वाइन मेकर्स असलेले कॅनडामधील जय आणि डोमिनिकच्या रुपात सापडल्याने 2018 मध्ये उत्पादन साकारण्याच्या प्रक्रियेस वेग मिळाला.

रोजगाराच्या संधी निर्माण

या वाइन निर्मात्यांनी 2018 आणि 2019 मध्ये जांभळाद्वारे मद्य तयार केले. त्याच्या पौष्टिकतेसाठी प्रयोगशाळेत चाचणीदेखील घेण्यात आली. त्यात चार आवश्‍यक खनिजे आढळले. तसेच सर्व आवश्‍यक जीवनसत्त्वे आणि रेझव्हेरट्रॉलसह ऍन्टी- ऑक्‍सिडेंट आढळून आले. यातून वाइनला "रेसवेरा' असे नाव दिले आहे. वाइन निर्मितीसाठीचे जांभूळ सह्याद्रीच्या जंगलातून प्राप्त होत आहेत. पश्‍चिम घाटातील शेकडो बचतगटांचा भाग असलेल्या आदिवासींकडून अत्यंत काळजीपूर्वक आणि स्वच्छतेने जांभूळ संग्रहित केले जाते. आदिवासींसाठी उन्हाळ्याच्या पीकमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. 

एक अब्ज बियांचे करणार मोफत वाटप 
वायनरीमधील बलून-प्रेस प्रक्रियेदरम्यान हजारो किलो बियाणे जांभळाच्या लगद्यापासून वेगळे केले जातात. या बियांपासून जांभळाची लागवड केली जाऊ शकते. त्यामुळे प्रक्रियेतून निघणारी सर्व बियाणे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना देशभर निशुल्क उपलब्ध करून दिली जात आहेत. आगामी वर्षभरात देशात एक अब्जापेक्षा जास्त जांभळाची बियाणे लागवड व वितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

दोन फ्लेवरमध्ये वाइन उपलब्ध 
रेसवेरा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. शुद्ध जांभळ्या रंगासह डीप रुबी रेड वाइन आनंददायी अनुभूती देणारी ठरते. तर सुंदर अशी डीप रोझ वाइनही तितकीच चविष्ट आहे. 

हेही वाचा > धगधगते वास्तव...मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोचली पण बॅंकांना सांगणार कोण?

कोकणातील सह्याद्री प्रदेशातील जंगलात पिकलेल्या जांभळांपासून रेसवेरा शुद्ध जामून वाइन तयार केली असून, ही प्रक्रिया सर्व कीटकनाशकांपासून मुक्त आहे. रेसवेरा वाइनच्या प्रत्येक सीपमध्ये शुद्ध जांभळाची उत्कृष्ट चव आहे. नाशिकमधील ही पहिली फ्रूट वाइन असून, रेसवेरा वाइनप्रेमींना अनोखी अनुभूती मिळेल. - डॉ. नीरज अग्रवाल, मुख्य कार्य अधिकारी, रेसवेरा 

हेही वाचा > संजय राऊत ऐकलतं का?...'सोनू सूदच्या पाठीशी गिरीश महाजन खंबीरपणे उभे आहे हं!'
 
जांभळाचे फळ त्याच्या जटीलतेमुळे रेफ्रिजरेशनमध्ये संरक्षित केले जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही वर्षभर जांभूळ आणि मद्यप्रेमींसाठी उपलब्ध असलेल्या या फळाची सेंद्रिय आवृत्ती तयार करण्याचे मार्ग शोधत होतो. अथक मेहनतीनंतर रेसवेरा टीम ही वाइन सादर करताना आनंदित आहे. - पीयूष सोमाणी, मार्गदर्शक रेसवेरा वाइन  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commercial production of purple wine nashik marathi news