पोलिस आयुक्तांच्या ‘ग्रीन ज्यूस’चा भलताच बोलबाला! खुद्द CP दीपक पांडे सांगताएत रेसिपी पाहा VIDEO

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

मुंबई येथील कारागृहातील कोरोना प्रतिबंधासाठी त्यांच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश आले. त्यातून त्यांनी सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी म्हणून एक दैनंदिनी आणली, तिला चांगला प्रतिसाद मिळाला. या सगळ्याचा पुढचा टप्पा म्हणून आता ग्रीन ज्यूस लोकप्रिय ठरतो आहे.

नाशिक : पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिकला कोरोना महामारीत पदभार स्वीकारल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या उपाययोजना पोलिस दलात लोकप्रिय ठरल्या, पण त्यांची ग्रीन ज्यूस रेसिपी अगदी सामान्य नाशिककर नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे.

नागरिकांसह पोलिस दलाचा मोठा प्रतिसाद

पोलिस आयुक्तांचा पोलिस कोविड सेंटरसह पोलिस दैनंदिनीचा उपक्रम त्यांच्या दर आठवड्यात शनिवारी पोलिस ठाण्याला आणि रोज सायंकाळी पोलिस चौकीला भेटी देण्याचा उपक्रम पोलिस दलात चर्चेचा विषय ठरत असताना त्यांची कोरोनाचा प्रादुर्भावापासून मुक्तची रेसिपी भलतीच लोकप्रिय ठरली आहे. व्हॉट्सअपसह सोशल मीडियावर ग्रीन ज्यूस रेसिपीचा चांगलाच बोलबाला आहे. मुंबई येथील कारागृहातील कोरोना प्रतिबंधासाठी त्यांच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश आले. त्यातून त्यांनी सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी म्हणून एक दैनंदिनी आणली, तिला चांगला प्रतिसाद मिळाला. या सगळ्याचा पुढचा टप्पा म्हणून आता ग्रीन ज्यूस लोकप्रिय ठरतो आहे.

काय आहे रेसिपी?

नाशिकच्या पोलिस आयुक्तांच्या ग्रीन ज्यूससाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. त्यातून काही अनिष्ट घडण्याची शक्यता नसल्याचे आयुर्वेदातील जाणकारही सांगतात. हेही लोकप्रियतेचे कारण आहे. ग्रीन ज्यूसमध्ये आवळा दोन नग, पालक भाजीचे दहा पाने, कोथिंबीर दहा पाने, पुदिना दहा पाने, बेलाची पाच पाने, कढीपत्ता २० पाने आणि आवश्‍यकतेनुसार जिरे आणि सेंदवा मीठ, लिंबू यातून हा ग्रीन ज्यूस केला जातो. आवश्यकतेनुसार, तुळस, पेरूचे पान, विड्याचे पान घेऊ शकतात.

हेही वाचा > महाराणीच्या दुर्लक्षित समाधीचा शोध; अंगठीतील हिरा गिळून केला होता देहत्याग

आयुक्तांची ज्यूस रेसिपी लोकप्रिय

या वस्तूंपासूनचा काढा करून घेण्याचे फायदे होत असल्याच्या प्रतिक्रिया येत असल्याने पोलिसांशिवाय सामान्य नागरिकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोलिस आयुक्तांची ज्यूस रेसिपी लोकप्रिय ठरते आहे. आयुक्तालयातील तसेच ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी आणि शहरातील नागरिकांनाही या ग्रीन ज्यूसबाबत माहिती देण्याचे काम सुरू केले आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांचे महामारीवर अधिक नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांना केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरू पाहत आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner of Police green juice recipe is becoming popular nashik marathi news