सोयाबीन बियाण्यांबाबत कंपन्या ढिम्मच...शेतकऱ्यांचे होतेय नुकसान!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 July 2020

जिल्हाभरातून प्राप्त तक्रारींनंतर कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाने तपासलेल्या तक्रारींमध्ये कमी उगवण क्षमतेच्या व पेरणीनंतर जोराचा पाऊस, असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. जूनमध्ये पेरणी केलेली असतानाही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याचे सांगितले जात आहे. 

नाशिक : जिल्ह्यात ६१ हजार ४४९ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी प्रास्तावित असतानाही यंदा ७३ हजार १०५ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, उगवण क्षमतेबाबत तक्रारी वाढत असून, ही संख्या १५० वर गेली आहे. मात्र, असे असले तरी बियाणे उत्पादक कंपन्या अजूनही बिनधास्त आहेत. एक तर बियाणे बदलून मिळावे अन्यथा नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सोयाबीन बियाण्यांबाबत कंपन्या ढिम्मच 

यंदा सोयाबीन बियाण्यांची दरवाढ झाली. त्यानंतर पेरण्या करूनही ते उतरले नाही. त्यामुळे एक तर बियाणे बदलून मिळावे अन्यथा नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. मात्र, कृषी विभागाने अद्याप फक्त तक्रारी तपासल्या आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना कठोर पावले उचलली गेलेली नाहीत. जिल्हाभरातून प्राप्त तक्रारींनंतर कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाने तपासलेल्या तक्रारींमध्ये कमी उगवण क्षमतेच्या व पेरणीनंतर जोराचा पाऊस, असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. जूनमध्ये पेरणी केलेली असतानाही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याचे सांगितले जात आहे. 

तक्रारींवर कृषी विभागाची भूमिका 

तक्रारी असल्या तरी कंपन्या बियाणे बदलून देण्यास तयार आहेत, तर काही सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचाही अनुभव कृषी विभागाला आला आहे. त्यामुळे याप्रश्‍नी सरकारने वेळीच भूमिका न घेतल्यास शेतकरी भरडला जाईल, अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. याबाबत संपर्क साधला असता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे चर्चा करत अहवाल सादर केला. मात्र, अजून काहीही प्रतिसाद आलेला नाही. काही संतप्त शेतकऱ्यांनीही कृषी विभागाकडे संपर्क केला. त्यावेळी थेट ग्राहक मंचाकडे जाऊन तक्रार करण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र कोणावरही अद्याप गुन्हा नोंदवला न गेल्याने यात शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे. 

कंपनीनिहाय तक्रारींची स्थिती 

कंपनी तक्रारी बियाणे बदलून दिले 
महाबीज : ६७ नाही 
कृषीधन : ३७ २ 
ईग : १० २ 
ग्रीन गोल्ड : १० नाही 
संजय सीड्स : ७ नाही 
व्हीगर : १० २ 
नोवेल : २ २ 

हेही वाचा > हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?

तक्रारीची स्थिती 

निफाड : ९३ 
चांदवड : ३४ 
नाशिक : दहा 
येवला : आठ 
सिन्नर : एक 
त्र्यंबकेश्‍वर : तीन 
मालेगाव : एक 
एकूण : १५० 

हेही वाचा > आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Companies are reluctant to accept soybean seeds nashik marathi news