धक्कादायक! गोदापात्रात खुलेआम होतोय मातीचा भराव...गोदाप्रेमींत प्रचंड नाराजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

महापालिका यंत्रणा न्यायालयीन आदेशाबाबत गंभीर नसल्यामुळेच नदीपात्रातील पूररेषेत बांधकाम करणे, माती काढणे, नदीत भराव टाकणे, नदीपात्र अरुंद करणे, अतिक्रमण करणे असे प्रकार सध्या सुरू आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकारांना न्यायालयाने आदेश देऊन पूर्णपणे प्रतिबंध केला आहे.

नाशिक : शहरात आनंदवली परिसरात गोदावरीपात्रालगत मातीचे उत्खनन करून त्यातील माती गोदापात्रात टाकून नदीचे पात्र संकुचित केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्खननामुळे गोदावरी किनारी असलेली झाडे उन्मळून पडली आहे, अशी पर्यावरणप्रेमींनी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. 

पर्यावरणप्रेमींची तक्रार

गोदावरी शहरात असलेल्या आनंदवली भागातील बंधाऱ्याजवळ काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची तक्रार निशिकांत पगारे यांनी केली. यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. दहा ते पंधरा दिवसांपासून गोदावरी नदीकिनारी पूररेषेत मातीचे उत्खनन सुरू आहे. नदीपात्रालगत सुरू असलेल्या उत्खनानातील माती काढून हा भराव पूररेषेतील नदीकिनारी टाकला जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र रुंद होत आहे. उत्खननामुळे गोदावरी किनारी असलेली झाडे उन्मळून पडली आहे, अशी पर्यावरणप्रेमींची तक्रार आहे. गोदावरी प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे नाशिक शहरात पालन होत नाही. 

गोदापात्र अरुंद करण्याचा प्रयत्न

महापालिका यंत्रणा न्यायालयीन आदेशाबाबत गंभीर नसल्यामुळेच नदीपात्रातील पूररेषेत बांधकाम करणे, माती काढणे, नदीत भराव टाकणे, नदीपात्र अरुंद करणे, अतिक्रमण करणे असे प्रकार सध्या सुरू आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकारांना न्यायालयाने आदेश देऊन पूर्णपणे प्रतिबंध केला आहे. "निरी' या संस्थेने मातीच्या भरावाबाबत प्रशासनाला वेळोवेळी सूचना केली आहे. मात्र त्यानंतरही नाशिक शहरात पूररेषेत बंदी असतानाही पात्रात मोठ्या प्रमाणावर माती टाकली जात आहे व गोदापात्र अरुंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची महापालिका यंत्रणेने दखल घेण्याची मागणी श्री. पगारे यांनी केली. 

हेही वाचा > कधी संपणार 'या' वाड्यांची शोकांतिका?...अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव

गोदापात्रात मातीचा भराव टाकून गोदावरीचे पात्र अरुंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मातीचे उत्खनन करून नदीपात्रात माती टाकणाऱ्यांना प्रतिबंध करून योग्य ती कारवाई करावी. - निशिकांत पगारे (गोदावरी प्रदूषण याचिकाकर्ते) 

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint that soil is being filled in Godapatr nashik marathi news