नाशिक, मालेगाव शहरात रात्रीची संचारबंदी; महामार्ग ओलांडण्यासंदर्भात मात्र संभ्रम 

विक्रांत मते
Wednesday, 23 December 2020

५ जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू राहील. परंतु मध्यरात्री महामार्गाने शहराबाहेर पडता येईल की नाही, याबाबत पोलिस यंत्रणेमध्ये संभ्रम दिसून आला. 

नाशिक : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळला आहे. त्या धर्तीवर खबरदरीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महापालिका हद्दींमध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी मंगळवार (ता. २२)पासून नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीत सुरू झाली आहे. रात्री अकरा ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापनप्रमुख जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. ५ जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू राहील. परंतु मध्यरात्री महामार्गाने शहराबाहेर पडता येईल की नाही, याबाबत पोलिस यंत्रणेमध्ये संभ्रम दिसून आला. 

महामार्ग ओलांडण्यासंदर्भात मात्र संभ्रम 
संपूर्ण युरोप व मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा, तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून, पुढील १५ दिवस अधिक सतर्क राहावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना क्वारंटाइन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. युरोपातून येणाया प्रवाशांना महापालिका आयुक्तांनी क्वारंटाइन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. 

हेही वाचा >> डॉक्टरांचे ऐकले असते तर आज 'त्यांचे' प्राण वाचले असते! परिसरात हळहळ

पोलिसांची अडचण 
संचारबंदी महापालिका क्षेत्रापुरती मर्यादित आहे. परंतु नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीतून महामार्ग जात असल्याने या महामार्गावरून वाहतूक बंद राहणार आहे की नाही, याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम दिसून आला. जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले. परंतु महामार्गावरील वाहतुकीबाबत स्पष्टता न केल्याने पोलिसांची अडचण झाली. नाशिकमधील उड्डाणपुलावरून मालेगावकडे तर मालेगाववरून धुळे, जळगावकडे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहने जातात.  

हेही वाचा >> पित्याच्या सांगण्यावरून अखेर घटनेचा ११२ दिवसांनी उलगडा; धक्कादायक माहिती समोर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: confusion regarding highway in Night curfew in Nashik Malegaon marathi news