एक नव्हे, दोन सदस्यांचा प्रभाग! काँग्रेसच्या बैठकीत ‘एकला चलो रे’चा नारा 

विक्रांत मते
Thursday, 21 January 2021

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असताना काँग्रेसनेदेखील जशास तसे उत्तर देताना स्वबळाचा नारा दिला आहे. त्याशिवाय एक नव्हे, तर दोन सदस्यांच्या प्रभागाची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. 

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असताना काँग्रेसनेदेखील जशास तसे उत्तर देताना स्वबळाचा नारा दिला आहे. त्याशिवाय एक नव्हे, तर दोन सदस्यांच्या प्रभागाची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. 

निवडणूक स्वबळावर..

महसूलमंत्री थोरात यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (ता. १९) हॉटेल एमराल्ड पार्कमध्ये पार पडली. आमदार सुधीर तांबे या वेळी उपस्थित होते. थोरात यांनी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. निवडणूक स्वबळावर लढण्याची प्रमुख मागणी या वेळी करण्यात आली. स्वबळावर १२२ जागा लढविल्यास कार्यकर्ते ती जागा निवडून आणण्यासाठी निकराचे प्रयत्न करतील, असे आश्‍वासन देण्यात आले. महापालिकेतील काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी सत्ताधारी भाजपकडून मोठ्या प्रमाणात बेकायदा कामे सुरू असल्याचे सांगताना आरक्षित भूखंडांच्या रकमेसंदर्भात सरकारी स्तरावर चौकशीची मागणी केली. या वेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष वत्सला खैरे, नगरसेवक राहुल दिवे, समीर कांबळे, आशा तडवी, लक्ष्मण जायभावे, हनीफ बशीर, विजय राऊत, नीलेश खैरे, सुरेश मारू, उद्धव पवार, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

प्रभाग एकचा नव्हे दोनचा 
निवडणुकीत प्रभागरचना करताना एकऐवजी दोन सदस्यांचा प्रभागाची मागणी करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने एक स्त्री व एक पुरुष उमेदवार देणे योग्य ठरेल. त्यासाठी दोन सदस्यांचा प्रभाग असावा, असे मत ठामपणे मांडण्यात आले. 

राष्ट्रवादीकडून धोका 
शहराध्यक्ष शरद आहेर यांनी २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीचा अनुभव कथन करताना मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. आघाडी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस उमेदवारांसमोर उमेदवार उभे करून अडचणीत आणण्याचे काम झाल्याचे सांगितले. 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress party has demanded that there should be two member wards in the municipal elections nashik