दिवाळीत रिअल इस्टेटला बूस्ट; ग्राहकांसाठी बांधकाम कंपन्यांकडून विविध योजना

विक्रांत मते
Thursday, 12 November 2020

शहरात सध्या पाचशेहून अधिक बांधकामांचे प्रकल्प सुरू असून, तेथील बुकिंग जवळपास फुल झाले आहे. दिवाळीच्या पुढील चार दिवसांत मुहूर्ताची खरेदी करण्यासाठी ग्राहक सरसावले आहेत.

नाशिक :  लॉकडाउननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने उद्योगव्यवसाय पुन्हा उभारी घेत असून, दिवाळीनिमित्त खरेदीदारांची संख्या वाढल्याने रिअल इस्टेटला बूस्टर डोस मिळत आहे. सात महिन्यांपासून मंदीच्या गर्तेत सापडलेल्या बांधकाम व्यवसायाला दसऱ्यानंतर ऊर्जितावस्था प्राप्त होत आहे.

शहरात सध्या पाचशेहून अधिक बांधकामांचे प्रकल्प सुरू असून, तेथील बुकिंग जवळपास फुल झाले आहे. दिवाळीच्या पुढील चार दिवसांत मुहूर्ताची खरेदी करण्यासाठी ग्राहक सरसावले आहेत. गंगापूर, चांदशी, मखमलाबाद, कामटवाडे, पाथर्डी व वडाळा शिवारात वास्तव्याला अधिक पसंती मिळत आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर याच भागात सर्वाधिक नवीन प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. घरांची वाढती मागणी लक्षात घेता बांधकाम व्यावसायिकांनी विविध योजना बाजारात आणल्या आहेत. घर खरेदीवर ताबा मिळत नाही, तोपर्यंत ठराविक रक्कम खरेदीदारांना मिळणार आहे. सोने, चारचाकी व दुचाकी, घरांच्या हप्त्यांमध्ये सवलत, मुद्रांक, जीएसटीमध्ये सवलत आदी योजना ग्राहकांना आकर्षित करत आहेत. 

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

औद्योगिक क्षेत्रात ओव्हर टाइम 

सातपूर, अंबड औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांना पाच दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली असली तरी उत्पादन मात्र सुरू आहे. जे कामगार सुटी असूनही कामावर हजर राहतील त्यांच्यासाठी दुप्पट वेतनासह ओव्हर टाइमही दिले जात आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत महिंद्र, बॉश व सीएट हे महत्त्वाचे उद्योग असून, या उद्योगांवर छोटे २४० हून अधिक उद्योग अवलंबून आहे. या मोठ्या कंपन्या सुरू असल्याने व्हेंडरला देखील काम मिळाल्याने छोट्या कंपन्यांमधील यंत्रांचा खडखडाट थांबलेला नाही. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

तीन दिवस बॅंकांना सुटी 

लक्ष्मीपूजन, रविवारची साप्ताहिक सुटी व सोमवारी पाडवा असल्याने बॅंकांचे कामकाज तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारपूर्वी बॅंकांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी वाढली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: construction business is gaining momentum in diwali nashik marathi news