दिवाळीत खाद्यतेलाला महागाईचा तडका! मागणी वाढल्याने भाववाढीच्या झळा

महेंद्र महाजन
Wednesday, 11 November 2020

लॉकडाउनमध्ये बंद झालेल्या बाजारपेठांच्या पार्श्‍वभूमीवर घरोघरी खाद्यतेल एक ते पाच महिने पुरेल इतके खरेदी केले गेले. त्यामुळे दुकाने हळूहळू उघडू लागल्यानंतरही खाद्यतेलाची फारशी मागणी राहिली नाही. त्यातच हॉटेल-रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ तयार करणारे कारखाने बंद होते.

नाशिक : दिवाळीनिमित्त घरोघरी फराळाच्या पदार्थांची लगबग सुरू असताना खाद्यतेलाला महागाईची फोडणी बसली आहे. १५ किलोच्या डब्यामागे चक्क २०० रुपयांनी भाववाढ झाली आहे. तसेच सद्यःस्थितीत नाशिक शहरात दिवसाला १५ ट्रकभर खाद्यतेलाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या तयारी सुरू होण्यापूर्वी दिवसाला दहा ट्रकभर खाद्यतेल विकले जात होते. 

मागणी आणखी वाढली
खाद्यतेलाचे घाऊक व्यापारी परेश बोधानी म्हणाले, की इंडोनेशिया, मलेशियामधून पामतेल आयात होते. नाशिकमध्ये पामतेलासह सोयाबीन, सूर्यफूल हेही आयात केलेले तेल मुंबईहून येते. शेंगदाणे तेल गुजरात, धुळ्याहून येते. लॉकडाउनमध्ये बंद झालेल्या बाजारपेठांच्या पार्श्‍वभूमीवर घरोघरी खाद्यतेल एक ते पाच महिने पुरेल इतके खरेदी केले गेले. त्यामुळे दुकाने हळूहळू उघडू लागल्यानंतरही खाद्यतेलाची फारशी मागणी राहिली नाही. त्यातच हॉटेल-रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ तयार करणारे कारखाने बंद होते. सरकारने हॉटेल-रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ निर्मितीला परवानगी दिल्याने खाद्यतेलाची मागणी वाढत गेली. अशातच, दिवाळीनिमित्त फराळाच्या पदार्थांची तयारी सुरू झाल्याने ही मागणी आणखी वाढली आहे. 

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

खाद्यतेलाची मागणी वाढल्याने भाववाढीच्या झळा

भाववाढ झाली असली, तरीही ग्राहकांनी खरेदीकडील हात आखडता घेतल्याचे दुकानदारांच्या निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळीसाठी खरेदी केलेल्या खाद्यतेलाच्या तुलनेत खरेदी कमी झाली आहे. सोयाबीनचे झालेले नुकसान हे सोयाबीन तेलाच्या भाववाढीसाठी कारणीभूत ठरल्याचे व्यापारी सांगताहेत. लॉकडाउनमध्ये शीपमेंट बंद राहिल्याने देशामध्ये दिवाळीच्या अगोदर पुरेसे आयात केलेले खाद्यतेल उपलब्ध झाले नाही. आता खाद्यतेलाची मागणी वाढल्याने भाववाढीच्या झळा बसत आहेत. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

खाद्यतेलाच्या भावाची तुलनात्मक स्थिती 
(आकडे १५ किलोच्या डब्याला रुपयांमध्ये) 

खाद्यतेल आताचा भाव पूर्वीचा भाव 
शेंगदाणे दोन हजार ४०० दोन हजार १०० 
सोयाबीन एक हजार ७०० एक हजार ५८० 
सूर्यफूल एक हजार ८५० एक हजार ७०० 
पाम एक हजार ६०० एक हजार १०० 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cooking oil prices rose on Diwali nashik marathi news