मक्याच्या भावात आता संक्रांतीनंतर तेजी! सोयाबीनचे अमेरिकेत भाव वाढल्याचा भारताला फायदा 

corn crop 1.jpg
corn crop 1.jpg

नाशिक : किमान आधारभूत किमतीपेक्षा पाचशे ते आठशे रुपये कमी भावाने मका विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. देशातून महिनाअखेर १७ लाख टनाची निर्यात होऊनही भाव सुधारले नाहीत. मात्र निर्यातीचा वेग कायम राहिल्यास मकरसंक्रांतीनंतर मक्याच्या भावात तेजी अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे अमेरिकेत सोयाबीनचे भाव चढे असल्याने त्याचा फायदा भारतातील शेतकऱ्यांना झाला आहे. सर्वसाधारणपणे साडेचार हजार रुपये क्विंटल असा भाव सोयाबीनला स्थानिक बाजारपेठेत मिळत आहे. 

मक्याच्या भावात आता संक्रांतीनंतर तेजी!
मक्याची किमान आधारभूत किंमत क्विटंलला एक हजार ८५० रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. पण त्यापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांना मका विकावा लागत असल्याने सरकारने आधारभूत किमतीने मक्याची खरेदी सुरू केली असली, तरीही राज्यात मका खरेदीचा वेग मंद आहे. दरम्यान, केंद्रीय कृषी विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार देशात यंदा अपेक्षित असलेल्या मक्याच्या उत्पादनापेक्षा कॉर्पोरेट क्षेत्राच्या अंदाजानुसार ४० लाख टन म्हणजेच, १५० ते १६० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. आत्तापर्यंत निर्यात झालेल्या मक्यामध्ये ८० टक्के वाटा बांगलादेश आणि नेपाळचा आहे. शिवाय श्रीलंकेतही मक्याची निर्यात झाली आहे. आणखी दहा टक्के मका निर्यात होण्यातून भावातील तेजीला हातभार लागणार आहे. 


शिल्लक साठ्याचे प्रमाण अधिक 
रब्बीमध्ये उत्पादित झालेल्या मक्याचा साठा देशात मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला. त्यामागे कोरोनामुळे कुक्कुटपालन खाद्यासाठी खप कमी झाल्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे मक्याचे भाव वाढू शकलेले नाहीत. जागतिक स्तरावर चीनने मका मोठ्या प्रमाणात आयात केला आहे. अशातच, मका उत्पादक ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये कोरड्या हवामानामुळे मक्याची उत्पादकता कमी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी, दोन महिन्यांत मक्याच्या भावात टनाला ५० डॉलरने वाढ झाली आहे. अमेरिका आणि युक्रेनच्या बंदरावर मका पोच होताना टनाला २४० ते २५० डॉलर इतका भाव मिळतो. 


देशाला ९० लाख टन सोयाबीनची गरज 
जगामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन करणाऱ्या ब्राझीलमधील कोरड्या हवामानामुळे उत्पादन कमी येण्याची शक्यता आहे. याच पार्श्‍वभूमीवर दुसऱ्या क्रमांकाच्या उत्पादक अमेरिकेने सोयाबीनची निर्यात मोठ्या प्रमाणात चीनमध्ये केली आहे. त्यामुळे भारतात सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेत क्विंटलला साडेचार हजार रुपये असा सरासरी भाव मिळत आहे. गेल्या वर्षी तीन हजार ८०० ते तीन हजार ९०० रुपये क्विंटल या भावाने सोयाबीनची विक्री झाली होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार १३६ लाख टन सोयाबीनचे उत्पादन अपेक्षित असले, तरीही कॉर्पोरेट क्षेत्राच्या अंदाजानुसार १०५ लाख टन सोयाबीनचे देशात उत्पादन अपेक्षित आहे. देशात वापरासाठी ९० लाख टन सोयाबीनची आवश्‍यकता असते. आत्तापर्यंत उत्पादित झालेल्या सोयाबीनपैकी जवळपास २० टक्के सोयाबीनची निर्यात झाली आहे. त्यात दक्षिण आशिया, अरब राष्ट्र, इराणचा समावेश आहे. 

राज्यातील नऊ लाख हेक्टर क्षेत्रातून ३५ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. प्रत्यक्षात सरकारने राज्यात आधारभूत किमतीने ४१ हजार टन मक्याची खरेदी केली आहे. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत म्हणून खरेदी वाढवणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मागील रब्बीमध्ये तेलंगणामध्ये ९ लाख टन मक्याची खरेदी आधारभूत किमतीने झाली होती. - दीपक चव्हाण, कृषी अभ्यासक, पुणे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com