जिल्ह्यात ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत १७६ ने घट; दिवसभरात ५३८ कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७०७, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३८, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच, जिल्‍हा रुग्‍णालयात पाच रुग्‍ण दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत ६४० अहवाल प्रलंबित होते.

नाशिक : बऱ्याच दिवसांनंतर जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्‍या रुग्‍णांपेक्षा दिवसभरात बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. सोमवारी (ता. ३०) दिवसभरात ३६७ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर कोरोनामुक्‍त झालेल्या रुग्‍णांची संख्या ५३८ होती. पाच रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत १७६ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात दोन हजार ७९० बाधितांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात आढळले ३६७ बाधित

सोमवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील २६२, नाशिक ग्रामीणमधील १०१, तर जिल्‍हाबाहेरील चार रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ४२४, नाशिक ग्रामीणमधील ११०, तर जिल्‍हा बाहेरील चार रुग्णांचा समावेश आहे. तर पाच मृतांमध्ये नाशिक शहरातील दोन व नाशिक ग्रामीणमधील तीन रुग्‍ण आहेत. पंचवटीमधील पेठ रोड येथील ५८ वर्षीय पुरुष, सिडकोच्या सावतानगर येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये देवळाली कॅम्‍प येथील ७९ वर्षीय पुरुष, शिंगवे (ता. नाशिक) येथील ७७ वर्षीय पुरुष आणि चौगाव रोड, सटाणा येथील ७६ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे.

सद्यःस्‍थितीत दोन हजार ७९० बाधितांवर उपचार

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख एक हजार १३७ झाली असून, यापैकी ९६ हजार ५५६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. एक हजार ७९१ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, सद्यःस्‍थितीत दोन हजार ७९० बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७०७, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३८, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच, जिल्‍हा रुग्‍णालयात पाच रुग्‍ण दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत ६४० अहवाल प्रलंबित होते. यापैकी ३४१ नाशिक शहरातील, २६९ नाशिक ग्रामीण, आणि मालेगावच्‍या ३० रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

मालेगाव निरंक

दरम्यान, मालेगाव महापालिका हद्दीत दिवसभरात एकही बाधित आढळला नाही, कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्याही शून्‍य राहिली आणि एकही मृत्‍यूची नोंददेखील नाही. तसेच, एकही संशयित रुग्‍णालयात दाखल झाला नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona active patients in district has decreased by 176 nashik marathi news