"भाऊ..तो कोरोना एकवेळेस परवडला..पण त्या मरणयातना..ते क्वारंटाईन सेंटर नको..!"

quarantine-center.png
quarantine-center.png

नाशिक : चार चार दिवस कुणी लक्ष देत नाही, स्वॅब घ्यायला कोणी येत नाही, वेळेवर नाश्‍ता-जेवण नाही, स्वच्छतेची बोंब, झोपण्यासाठी चांगले पलंग नाहीत, कोरोनाची लागण झालेली नसताना केवळ त्यांच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाइन सेंटरमधील निगेटिव्ह रुग्णांची ही व्यथा आहे. एकदम दुर्लक्षित केल्यासारखी ट्रीटमेंट मिळत असलेल्या कोरोनापेक्षा तेथील वातावरणच मरणयातना देणारे असल्याच्या क्वारंटाईन रुग्णांच्या भावना आहेत. 

क्वारंटाइन रुग्ण अस्वस्थ

कोरोना रुग्णांची संख्या रोज शेकडोने वाढत असताना बाधित (पॉझिटिव्ह) रुग्णांच्या संपर्कातील नातेवाइकांच्या जिवाशी खेळ सुरू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना यंत्रणा क्वारंटाइन करते. त्यानंतर त्यांचा छळ सुरू होतो. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील रुग्णांना समाजकल्याण कार्यालयाच्या क्वारंटाइन केंद्रावर ठेवले आहे. पण चार ते पाच दिवसांपासून रुग्णांकडे कुणी फिरकले नाही. वॉर्डात पलंग मोडकळीस आले आहेत. प्रचंड अस्वच्छता, वीज-पाण्याची सोय नाही. दोन दिवसांतून एकदा जेवण येत असल्याने दोन दिवसांची भूक एक दिवसावर भागवावी लागते. अशा एक ना अनेक समस्यांनी क्वारंटाइन रुग्ण अस्वस्थ आहेत. 

स्बॅब घेण्याची बोंबाबोंब 
रुग्णांना क्वारंटाइन केले पण त्यांचे स्वॅबच घेत नाहीत. त्यामुळे निगेटिव्ह येणाऱ्यांना घरी तरी सोडता येईल. पण स्वॅब नाही म्हणून रिपोर्ट नाही अशा खितपत पडलेल्या क्वारंटाइन रुग्णांच्या व्यथा आहेत. हे कमी की काय त्यात अनेक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्याच सहवासात राहून कोरोना नसलेल्यांना कोरोनाची लागण होत असल्याने अक्षरशः जिवाशी खेळ सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. 

तर त्याच्या जिवाचे काय होणार?

आमची तब्येत चांगली आहे पण या क्वांरटाइन केंद्रामुळे मात्र निश्‍चित आम्हाला आजारपण लागणार आहे. आमच्या जिवाला धोका आहे. क्वारंटाइन केंद्रातील ऍडमिट लोकांना कोणी वाली नसल्याचा येथील अनुभव आहे. वेळेवर पाणी, जेवणही मिळत नसल्याने दुर्दैवाने जर या लोकांत कोणी कोरोनाग्रस्त आढळून आला तर त्याच्या जिवाचे काय होणार? -किरण बाप्ते 


आमच्या शेजारी कुटुंबात कोरोनाबाधित सापडला त्यात आमचा काय दोष? क्वारंटाइन करून येथे ठेवले पण इथली भयानक परिस्थिती बघून आमचे मनोधैर्य आणि प्रतिकारशक्ती कशी टिकून राहील. चार चार दिवस होऊन आमची टेस्ट होत नाही. कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. त्याऐवजी दुसऱ्याच आजाराने आणि येथील वातावरणाने आमच्या जिवाला धोका आहे. -वीरेंद्र मेहेत्रे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com