गाव हळहळले! अख्खं कुटुंब उध्वस्त; कुटुंबातील सर्व कर्त्या पुरुषांवर कोरोनाने मृत्यूचा घाला

प्रमोद सावंत
Thursday, 20 August 2020

अशा एकापाठोपाठ एक दु:खाचे धक्के सहन करीत वाटचाल करत असलेल्या या कुटुंबातील तिघांचा आठवडाभरात मृत्यूने अवघा बाराबंगला परिसर हळहळला आहे. ​

नाशिक / मालेगाव :  एकापाठोपाठ एक दु:खाचे धक्के सहन करीत वाटचाल करत असलेल्या या कुटुंबातील तिघांचा आठवडाभरात मृत्यूने अवघा बाराबंगला परिसर हळहळला आहे. ​

मालेगावच्या पवार कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

कमलकांत पवार यांनी जुन्या काळात शिक्षण घेऊन कुटुंबातील सर्वांना उच्चविद्याविभूषित केले. ते स्वत: महापालिकेत अभियंता होते. पाच मुले व तीन मुली असा त्यांचा परिवार. या कुटुंबाने स्वकष्टातून प्रगती साधतानाच उच्च पदांना गवसणी घातली. त्यामुळे हे कुटुंब अनेकांचे आदर्श. गेल्या महिन्यापासून बाराबंगला व परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. यातूनच मिलिंद, महेंद्र यांच्यासह कुटुंबीयांना कोराेनाची लागण झाली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कामात अग्रेसर असलेले या कुटुंबासाठी अनेकांची धावपळ सुरू होती. मात्र, मिलिंद यांचा ११ ऑगस्टला कोरोनामुळे मृत्यू झाला. याचदरम्यान महेंद्र यांचीही प्रकृती खालावली अन्‌ अवघ्या तीन दिवसांनंतर नाशिक येथे उपचार सुरू असतानाच महेंद्रलाही मृत्यूने गाठले. कुटुंबीयांनी वडिलांची प्रकृती व वय पाहता मिलिंदच्या मृत्यूचे वृत्त दडवून ठेवले. मात्र घरातील दोन कर्ते पुरुष गेल्यानंतरच्या वातावरणाची जाणीव या पिकल्या पानाला झाली अन्‌ त्यांच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. कर्त्या व कर्तबगार अशा दोन पुत्रांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांनीही बुधवारी या जगाचा निरोप घेतला.

दु:खाचा डोंगर पवार कुटुंबीयांची पाठ सोडेना
व्यवसायाने वकील असलेले पुत्र किशोर पवार व त्यांच्या पुत्राचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यापाठोपाठ कमलकांत पवार यांचे जावई व प्रा. शशिकला पवार यांचे पती वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप केदारे यांचेही हृदयविकाराने निधन झाले. या दु:खातून कुटुंबीय सावरते न सावरते तोच महापालिका उपायुक्त शिरीष पवार यांच्या पत्नी विजया यांचे अल्प आजाराने निधन झाले. अशा एकापाठोपाठ एक दु:खाचे धक्के सहन करीत वाटचाल करत असलेल्या या कुटुंबातील तिघांचा आठवडाभरात मृत्यूने अवघा बाराबंगला परिसर हळहळला आहे. हे सर्व दु:ख पचवत असतानाच कुटुंबातील अन्य सर्व सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, हीच काय ती कुटुंबीयांसाठी समाधानाची बाब आहे. 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

कोरोनाने दोन पुत्र हिरावले अन्‌ पित्यानेही सोडले प्राण

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त शाखाधिकारी मिलिंद पवार (वय ६०) व महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे लिपिक महेंद्र पवार (५६) या बाराबंगला भागातील दोघा बंधूंचा गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यापाठोपाठ दोघा पुत्रांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्यांचे वडील कमलकांत कावजी पवार (वय ९२) यांचेही बुधवारी (ता. १९) सकाळी निधन झाले. एकाच कुटुंबातील दोन कर्ते पुत्र व वडील अशा तिघांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन : ब्रिजकुमार परिहार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona gave birth to two sons And the father also gave up his life