चिंताजनक! कोरोना हॉटस्पॉट मालेगावमध्ये अवघे 'इतकेच' व्हेंटिलेटर?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

जिल्ह्याला धडकी भरविणाऱ्या मालेगावची रुग्णसंख्या व तिथले रुग्ण नाशिक किंवा धुळ्याला हलविण्यास विरोधावरून राजकीय रणकंदन माजले असताना या शेकडो रुग्णांसाठी मालेगावच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये केवळ एवढेच​ व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

नाशिक : जिल्ह्याला धडकी भरविणाऱ्या मालेगावची रुग्णसंख्या व तिथले रुग्ण नाशिक किंवा धुळ्याला हलविण्यास विरोधावरून राजकीय रणकंदन माजले असताना या शेकडो रुग्णांसाठी मालेगावच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये केवळ एवढेच व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. मालेगाव महापालिका, तसेच सामान्य रुग्णालयाने मिळून आणखी इतक्या व्हेंटिलेटरची मागणी केली आहे. 

रुग्णाच्या हलवाहलवीवरून रान पेटवतंय

मालेगावच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी किती मोठा पल्ला गाठण्याची गरज आहे, हे यावरून स्पष्ट व्हावे. त्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी लोकप्रतिनिधी रुग्णाच्या हलवाहलवीवरून रान पेटवत आहेत. मालेगाव शहर लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी करीत आहेत. मालेगावला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 8 एप्रिलला आढळला. शुक्रवारी एक महिना पूर्ण झाल्यानंतर रुग्णांची संख्या 514 वर पोचली. दरम्यान, चाळीस रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर 18 कोरोनाबाधित मृत पावले. शनिवारी दाखल झालेल्या 40 जणांसह सध्या मालेगावमध्ये 416 रुग्ण उपचार घेत आहेत. गंभीर रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी कृत्रिम श्‍वासोच्छश्‍वासाची गरज भासते आणि मालेगाव महापालिका रुग्णालयात दहा व सामान्य रुग्णालयात दोन, असे मिळून अवघे 12 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अशी मरणासन्न असताना मालेगावचे रुग्ण नाशिक किंवा धुळ्याला हलवावेत की नाही, यावरून राजकीय वाद सुरू आहेत. भाजपच्या आमदार, खासदारांनी रुग्ण नकोत अशी भूमिका घेतली असून, त्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. 

खासगी रुग्णालयांमध्ये 46 व्हेंटिलेटर

या नेत्यांच्या समर्थनार्थ काही मंडळींनी मालेगाव लष्कराच्या ताब्यात द्या, अशा मागणीची मोहीम शनिवारी सायंकाळी ट्‌विटरवर चालवली. परंतु स्थानिक रुग्णालयांमध्ये अतिजोखमीच्या रुग्णांसाठी व्यवस्था काय आहे, याची चौकशी केली नाही. मालेगाव महापालिकेने तिच्या रुग्णालयासाठी आणखी वीस, तर सामान्य रुग्णालयाने तीस, अशा पन्नास व्हेंटिलेटरची मागणी केली आहे. मालेगावचा उन्हाळा कडक असतो. पत्र्याच्या खोलीत हा उन्हाळा काढावा लागत असल्याने आरोग्याच्या समस्या उद्‌भवतात. श्‍वसन विकाराचे प्रमाण वाढते. अशावेळी व्हेंटिलेटरची आवश्‍यकता अधिक भासेल. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये 46 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सरकारी रुग्णालयांची मागणी पूर्ण होईपर्यंत गरज पडली तर खासगी व्हेंटिलेटर अधिग्रहित करावे लागतील. 

हेही वाचा > कृषीमंत्र्यांची प्रार्थना अन् मौनव्रताला मारूतीराया पावणार का? मंदिरात तब्बल तीन तास ठिय्या

मालेगावची आरोग्य स्थिती 

एकूण कोरोना संशयित --- 514 
उपचार सुरू असलेले --- 416 
मृत्युमखी पडलेले --- 18 

व्हेंटिलेटरची सद्यःस्थिती 

मालेगाव मनपा --- दहा 
सामान्य रुग्णालय --- दोन 
खासगी रुग्णालये --- 45 

हेही वाचा > 'त्याची' एंट्री होताच...रात्री ग्रामस्थांनी चक्क फोडले फटाके..अन् मग

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Hotspot Malegaon Government Hospital has only twelve ventilators nashik marathi news