पोळा सणावर कोरोनाचे सावट! बळीराजाचा कमी पैशांत साहित्य खरेदीकडे कल

भगवान हिरे
Friday, 14 August 2020

दोन बैलांसाठी पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च करणारा शेतकरी यंदा तीनशे ते पाचशे रुपये खर्च करून आपल्या बैलांना सजवणार आहे. 

नाशिक / साकोरा : वर्षभर शेतात राबराब राबताना ज्याच्या मदतीने शेतीची कामे पूर्ण केली जातात, अशा सर्जाराजाचा असलेला पोळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र या सणावर कोरोनाचे सावट आहे तसेच बळीराजा आर्थिक विवंचनेत असूनही कमीत कमी पैशांमध्ये आपल्या बैलांसाठी तो खरेदी करत आहे. 

पोळ्यानिमित्त नांदगावची बाजारपेठ सजली आहे. साहित्य खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यानी गर्दी केली आहे. या वर्षी पाऊस चांगला झाला. परंतु कोरोनाचे सावट असल्याने शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कमी किमतीचे साहित्य खरेदी करण्याकडे भर देत आहे. यामुळे बाजारात कमी उलाढाल होत आहे. पूर्वी दोन बैलांसाठी पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च करणारा शेतकरी यंदा तीनशे ते पाचशे रुपये खर्च करून आपल्या बैलांना सजवणार आहे. 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वा

साहित्याच्या किमती 
गोंडे- १५० ते २०० रुपये 
कपाळाची आरसी- १०० ते १५० रुपये 
कवडी गेज- ९० ते १५० रुपये 
एसन- ५० ते ६० रुपये 
गोप मोरखी- ६० ते ८० रुपये 
काचरे- ४० ते ६० रुपये 
शेंदूर- ५० ते ६० रुपये 
पितळी गेज पट्टा- ८०० ते १००० रुपये 
पाठीवरची झूल- ६०० ते ८०० रुपये 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

कोरोनामुळे शेतीमालाला भाव नसल्याने थोडक्यात थोडा बाजार केला. बैलांची परतफेड म्हणून हा सण साजरा करावा लागतो. गेल्या वर्षी पंधराशे रुपयांचा बाजार केला. मात्र, यंदा तीनशे रुपयांत गुजराण करावी लागली. 
- कारभारी शिंदे, नांदगाव 

पोळा सण बाजार आहे. विक्रीसाठी साज गोंडे, मोरखी, कासरे, पैंजण, शेंदूर, रंग खरेदी करून ठेवले आहे. कोरोनामुळे पाहिजे तशी विक्री झाली नाही. 
- अबझल मुल्ला, संचालक मुल्ला ॲन्ड सन्स 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona outbreak affects pola celebration in nashik marathi news