कोरोनाबाधित डॉक्टरचा आरोग्य सेवकांना शिवीगाळ करत हल्ला; मग पुढे घडले असे..

रामदास कदम
Friday, 18 September 2020

दिंडोरीच्या एका प्रतिष्ठित उच्च शिक्षित डॉक्टरकडून कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबीयातील व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी घरी आलेल्या आरोग्य सेवक, आशा प्रवर्तक यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करुन अंगावर धाऊन जात हल्ला चढविल्याचा प्रकार शिवाजीनगर भागात घडला.

नाशिक/दिंडोरी : जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्ण व रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करुन कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना बाधित रूग्णांची माहिती संकलित करण्यासाठी घरी आलेल्या डॉक्टर, आरोग्य सेवक व आश प्रवर्तकांवर हल्ले चढवून त्यांना मारहाण करण्याच्या अनेक घटना देखील घडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकाकडून भितीपोटी व अज्ञानातून हे प्रकार घडत असले तरी ते समजण्याजोगी आहे. मात्र उच्च शिक्षित डॉक्टरला कोरोनाचे गांभीर्य समजून येत नसेल तर ही चिंतेची बाब आहे.

अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी

दिंडोरीच्या एका प्रतिष्ठित उच्च शिक्षित डॉक्टरकडून कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबीयातील व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी घरी आलेल्या आरोग्य सेवक, आशा प्रवर्तक यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करुन अंगावर धाऊन जात हल्ला चढविल्याचा प्रकार शिवाजीनगर भागात घडला. याप्रकरणी दिंडोरी पोलिसात डॉक्टर व आई विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिंडोरीच्या शिवाजीनगर भागत राहणारे डॉ ज्ञानराज बाळासाहेब देसले यांना कोरोनाची लागण होवून त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टर व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्तींची कंटेंटमेंट झोन तयार करण्यासाठी माहिती संकलित करण्यासाठी डॉक्टर ज्ञानराज देसले यांच्या शिवाजीनगर येथे असलेल्या निवासस्थानी आरोग्य सेवक ए.ए.सय्यद, राजेंद्र जगताप, गट प्रवर्तक ज्योती जाधव ,आशा कार्यकर्ती अश्विनी गांगुर्डे हे गेले असता डॉक्टरने अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला व परत घराकडे फिरकले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर डॉक्टरांच्या आईने आपटून आत्महत्या करण्याची धमकी देत आरोग्य सेवकांना माघारी परतण्याचे सांगत आरडाओरड केली.

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

या कारणांसाठी झाला गुन्हा दाखस

 दिंडोरी पोलिसांनी कोरोना विषाणु संदर्भात महाराष्ट्र शासनाने, पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशांचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करुन हयगय व बेदरकापणे मानवी जिवीतास व याक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन कोरोना संसर्ग पसरविण्याची हयगईची व घातक कृती करुन शासनाचा विविध आदेशाचा भंग केल्याचा भादवि कलम 188, 269, 270, 271, 290, 504, 506 सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम चे कलम 2,3,4 महाराष्ट्र, कोविड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 2005 चे उल्लंघन कलम 514 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर येथील डॉक्टर ज्ञानराज देसले यांचे निवासस्थान व हॉस्पिटल परिसर सील करण्यात आले असुन परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. पुढील तपास दिंडोरी पोलिस करत आहेत.

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive doctor abuses health workers nashik marathi news