दिलासादायक! ‘मविप्र’ रुग्णालयात कोरोनामुक्तांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक

Corona recovery at MVP Hospital The ratio is higher than the national average
Corona recovery at MVP Hospital The ratio is higher than the national average

नाशिक : देशामध्ये कोरोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६९.८ टक्के आहे. या राष्ट्रीय प्रमाणपेक्षा अधिक रुग्ण येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात बरे झालेत. गेल्या महिन्याखेर ९०१ कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यापैकी ६३६ जण कोरोनामुक्त झालेत. त्यात पोलिस, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांचा समावेश आहे. रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्के आहे. शिवाय कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये गेल्या महिन्याखेरपर्यंत १३ हजार ४० चाचण्या करण्यात आल्या आहेत.

महिन्याखेर आठ हजार १७५ रुग्णांची तपासणी

‘मविप्र’च्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, की डॉ. पवार महाविद्यालयाच्या रुग्णालयात ‘डेडीकेटेड’ कोविड रुग्णालयाच्या (डीसीएच) ६० खाटा, तर कोविड केअर सेंटरच्या शंभर खाटा आहेत. अतिगंभीर रुग्णांसाठी आरआयसीयू या विशेष अतिदक्षता कक्षात २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली व सल्ल्याने औषधोपचार, निवासी डॉक्टर, फिजिओथेरपी, परिचारिका, वॉर्डबॉय, आया यांच्या सेवा आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, व्हेंटिलेटर, मोबाईल एक्स-रे, लॅब अशा सुविधा २४ तास उपलब्ध आहेत. बाह्यरुग्ण विभागातही गेल्या महिन्याखेर आठ हजार १७५ रुग्णांची कोरोनाविषयक प्राथमिक तपासणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीमती पवार, कार्यकारिणीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी डॉ. पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील आणि रुग्णालयाची टीम काम करत आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवत आहेत. महाविद्यालयातर्फे रोज सकाळी आणि सायंकाळी प्रत्येक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी रुग्णालयातील उपचारासंबंधी संवाद साधला जातो.

मविप्र रुग्णालयाने मला आपुलकीची सेवा दिली. राज्यातील सर्वांत चांगलं हे रुग्णालय आहे. मी खूप गंभीर परिस्थितीत इथे दाखल झालो होतो. मला आणि प्रत्येक रुग्णाला इथल्या डॉक्टर आणि परिचारिका, कर्मचारी यांनी खूप चांगली सेवा दिली. मी या रुग्णालयाचा ऋणी आहे.
-महेमूद पटेल (बरा झालेला रुग्ण, नाशिक)

(संपादन : ब्रिजकुमार परिहार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com