नाशिकमध्ये अडीच लाख नागरिकांची कोरोना चाचणी; सहा लाख बाधितांच्या संपर्कात 

विक्रांत मते
Tuesday, 27 October 2020

एप्रिलमध्ये शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. मेपर्यंत कोरोना स्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर मात्र पाचशे व सप्टेंबरमध्ये हजाराच्या पटीत रुग्ण आढळले. कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर महापालिकेचे चार रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्यात आली.

नाशिक : शहरात कोरोनाची लागण झाल्यापासून सात महिन्यांत शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अडीच लाख नागरिकांनी कोरोना तपासणी केली आहे. त्यात ६१ हजारांपेक्षा अधिक नागरिक कोरोनाबाधित आढळले. सहा लाख नागरिक कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले आहे. 

शहरात दोन हजार ९४५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण

महापालिकेच्या साप्ताहिक अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. एप्रिलमध्ये शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. मेपर्यंत कोरोना स्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर मात्र पाचशे व सप्टेंबरमध्ये हजाराच्या पटीत रुग्ण आढळले. कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर महापालिकेचे चार रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्यात आली. त्याचबरोबर सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. खासगी रुग्णालयांमध्येही मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली. तपासणीत नाशिक राज्यात आघाडीवर राहिले. एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्यामागे ३४ नागरिकांची तपासणी अर्थात, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. सात महिन्यांत अडीच लाख नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात एक लाख ६६ हजार ७९४ नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर ६१ हजार नागरिक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातील उपचार व होम क्वारंटाइनमुळे ५७ हजार १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे ८५३ नागरिक मृत झाले. सध्या शहरात दोन हजार ९४५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

 तीन लाख हायरिस्कमध्ये 

सात महिन्यांत शहरात १४ हजार ७४ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली, अशा सहा लाख नागरिकांची तपासणी झाली. यात हायरिस्क तीन लाख पाच हजार ६९५, तीन लाख ९७५ नागरिक लो रिस्क आढळले. 
 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona test of two and a half lakh citizens in Nashik marathi news