CoronaUpdate : जिल्ह्यात नव्याने १ हजार १४९ रुग्ण; तर बरे झाले १ हजार ८६

अरुण मलाणी
Monday, 7 September 2020

सोमवारी आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ७३४, ग्रामीणचे ३४३, मालेगावचे ७२ रुग्ण आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ८३९ झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यात रोजच एक हजारहून अधिक रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह येत असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण तुलनेत कमी-अधिक होत आहे. त्यामुळे ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत किरकोळ वाढ होत आहे. सोमवारी (ता. ७) दिवसभरात एक हजार १४९ नवीन रुग्ण आढळले. तर एक हजार ८६ रुग्‍ण घरी परतले. वीस रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ४३ ने वाढ झाली असून, सात हजार ७३४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरातील ७३४ रुग्ण

सोमवारी आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ७३४, ग्रामीणचे ३४३, मालेगावचे ७२ रुग्ण आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ८३९ झाली आहे. तर, बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ८७८, ग्रामीणचे १७३, मालेगावचे ३४ आणि जिल्‍हाबाह्य एक रुग्ण आहे. तसेच, वीस मृतांमध्ये नाशिक शहरातील १२, ग्रामीणचे सात आणि मालेगाव येथील एकाचा समावेश आहे. त्यामुळे सध्या सात हजार ७३४ रुग्ण उपचार घेत आहेत. 

दिवसभरात दाखल झालेले रुग्ण

दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार २१७, नाशिक ग्रामीण व गृहविलगीकरणात २७९, मालेगाव महापालिका हद्दीतील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४६, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय २२, जिल्‍हा रुग्‍णालयात सहा संशयित रुग्‍णांना दाखल केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ८१४ अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक एक हजार १६८ नाशिक ग्रामीणमधील आहेत. 

हेही वाचा >  ब्रेकिंग : रस्त्यावर प्रसुती झालेल्या बाळंतीण महिलेवर डॉक्टरचा दबाव; "महिला रुग्ण व डॉक्टर" मधील वादग्रस्त संभाषणाचा VIDEO व्हायरल

मालेगावला ७२ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू 

मालेगाव : शहर व परिसरातील ७२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. तर, शहरातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ११६ झाली आहे. सोमवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये पूर्व भागातील तीन, तर उर्वरित रुग्ण शहराच्या कॅम्प, संगमेश्‍वर, नववसाहत, कलेक्टरपट्टा या पश्‍चिम व ग्रामीण भागातील आहेत. बागलाण तालुक्यातीलही दोघांचा यात समावेश आहे. दिवसभरात नव्याने ४६ रुग्ण दाखल झाले असून, २९० अहवाल प्रलंबित आहेत. शहरातील एकूण दोन हजार ९०३ रुग्णांपैकी दोन हजार १४० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१२ आहे. 

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

येवल्यात आढळले १२ रुग्ण 

येवला : येवला शहरातील सहा, अंदरसूल येथील तीन आणि मानोरी, सायगाव व एरंडगाव येथील प्रत्येकी एक अशा बारा जणांचे कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहर व तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ४४१ झाली आहे. आतापर्यंत ३१४ जण बरे होऊन घरी परतले असून, एकूण ३३ जणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. सध्या ९५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी सांगितले.  

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update 1149 new patient found in nashik marathi news