पोलिसावर प्राणघातक हल्ला पडला महागात.. दोन्ही नगरसेवकांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

बीटमार्शल विष्णू गावित यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी ते अंबड औद्योगिक वसाहतीत दुचाकीवरून पेट्रोलिंग करीत होते. रात्री नऊच्या सुमारास एक्‍स्लो-पॉइंट येथे अल्टो कार आणि पिक-अप यांच्यात समोरासमोर, तर पिक-अपला पाठीमागून ह्युंदाई कारची धडक असा तिहेरी अपघात झाला. त्या वेळी बीटमार्शल गावित व होमगार्ड सोनवणे घटनास्थळी पोचले.​त्यानंतर...

नाशिक : अंबड लिंक रोडवरील एक्‍स्लो-पॉइंट येथे झालेल्या अपघातात वाहने हटविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे व भाजपचे नगरसेवक राकेश दोंदे यांच्यासह गुंडांनी बेदम मारहाण केली. पोलिस कर्मचाऱ्याचा गळा आवळून ठार करण्याचा प्रयत्न केला. होमगार्ड आणि दोघांना सोडविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकालाही मारहाण केली. नगरसेवक भागवत आरोटे, राकेश दोंदे, अमित आरोटे यांच्यासह आठ-दहा जणांविरोधात अंबड पोलिसांत प्राणघातक हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. दोन्ही नगरसेवकांना दोन दिवसांची पोलिस कोठडी, तर अमित आरोटे, राजेश शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

काय घडले नेमके?

अंबड पोलिस ठाण्याचे बीटमार्शल विष्णू गावित यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. 28) ते अंबड औद्योगिक वसाहतीत दुचाकीवरून पेट्रोलिंग करीत होते. रात्री नऊच्या सुमारास एक्‍स्लो-पॉइंट येथे अल्टो कार आणि पिक-अप यांच्यात समोरासमोर, तर पिक-अपला पाठीमागून ह्युंदाई कारची धडक असा तिहेरी अपघात झाला. त्या वेळी बीटमार्शल गावित व होमगार्ड सोनवणे घटनास्थळी पोचले. रस्त्याच्या मधोमध अपघात झाला. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने, गर्दी हटवून त्यांनी ह्युंदाईचा चालक अमित आरोटे यास कार मागे घेण्यास सांगितले. गावित अल्टो कार बाजूला घेत होते. त्या वेळी संशयित नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेवक राकेश दोंदे तरुणांसह घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

पोलिस घटनास्थळी दाखल

नगरसेवक आरोटे यांनी घटनेची माहिती न घेता पोलिस गावित यांना अल्टोमधून बाहेर ओढून शिवीगाळ करीत मारहाण केली. नगरसेवक दोंदे यांनी गावित यांना पकडून ठेवत भागवत आरोटे, अमित आरोटे, राहुल आरोटे, राजेश शर्मा, अजय मिश्रा यांच्यासह आठ-दहा जणांनी बेदम मारहाण केली. होमगार्ड सोनवणे त्यांच्या बचावासाठी धावले असता, त्यांनाही मारहाण केली. त्या वेळी गर्दीतून स्वप्नील खांडबहाले मदतीसाठी आले. त्यांनाही संशयितांनी मारहाण केली. गावित यांचा गळा आवळून ठार करण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्यातून सुटका करून घेत त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

अखेर अटक

पोलिसांनी नगरसेवक राकेश दोंदे, अमित आरोटे, राजेश शर्मा यांना अटक केली. तर, भागवत आरोटे, राहुल आरोटेसह संशयितांनी पलायन केले. मध्यरात्री अंबड पोलिसांत प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नगरसेवक आरोटे यांनाही अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator punished jail for Assault on police nashik marathi news