‘बिटको’ खासगीकरणाच्या विरोधात भाजप-शिवसेनेचे नगरसेवक एकत्र

विक्रांत मते
Tuesday, 15 September 2020

नवीन बिटको रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसविल्यानंतर खासगी रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर परत घेण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या. भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी बिटको रुग्णालयातील व्यवस्थापनाचे खासगीकरणाचा विषय चर्चेला आणला. भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी बिटको रुग्णालयाचे खासगीकरण कदापि होऊ देणार नसल्याचा इशारा दिला.

नाशिक : गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत बिटको रुग्णालयातील व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा निर्णय नाशिक रोड विभागातील भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांना रूचला नाही. त्यामुळे ऑनलाइन महासभेत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या भूमिकेवर आगपाखड करत खासगीकरण करू नये, अशी भूमिका घेतली. 

नवीन बिटको रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसविल्यानंतर खासगी रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर परत घेण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या. भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी बिटको रुग्णालयातील व्यवस्थापनाचे खासगीकरणाचा विषय चर्चेला आणला. भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी बिटको रुग्णालयाचे खासगीकरण कदापि होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. गरिबांसाठी सेवा देणारे रुग्णालय असल्याने खासगीकरण करण्याऐवजी मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर विकास करण्याची मागणी त्यांनी केली. प्रा. शरद मोरे यांनी रुग्णालय खासगीकरण करण्यास तीव्र विरोध दर्शविला. शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, सुनील गोडसे यांनी विरोध दर्शविला. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

व्हेंटिलेटर परत घेणार 

पंतप्रधान केअर फंडातून महापालिकेला प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटरचा मुद्दा सभागृहनेते सतीश सोनवणे, गुरुमित बग्गा, सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित करताना खासगी रुग्णालयांना वापरासाठी देण्यात आलेले व्हेंटिलेटर परत घेण्याची मागणी केली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था नसल्याने १३ व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना दिल्याची कबुली वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयांना देण्यात आलेले तेरा व्हेंटिलेटर परत घेण्याच्या सूचना महापौर कुलकर्णी यांनी दिल्या.  

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporators oppose privatization of hospital nashik marathi news