बिटको, डॉ. झाकिर हुसेन वगळता सर्व कोविड सेंटर बंद; रुग्ण दाखल न करण्याच्या सूचना 

विक्रांत मते
Thursday, 21 January 2021

कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या पाच कोविड सेंटरपैकी डॉ. झाकिर हुसेन व नवीन बिटको रुग्णालय वगळता सर्व सेंटर बंद करण्याचा निर्णय पालिकेच्या वैद्यकीय विभागाने घेतला असून, क्रेडाईच्या माध्यमातून उभारलेल्या ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये अवघे आठ रुग्ण दाखल असल्याने नवीन रुग्णांची भरती करण्यास बंदी घातली आहे.

नाशिक : कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या पाच कोविड सेंटरपैकी डॉ. झाकिर हुसेन व नवीन बिटको रुग्णालय वगळता सर्व सेंटर बंद करण्याचा निर्णय पालिकेच्या वैद्यकीय विभागाने घेतला असून, क्रेडाईच्या माध्यमातून उभारलेल्या ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये अवघे आठ रुग्ण दाखल असल्याने नवीन रुग्णांची भरती करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत तेदेखील सेंटर बंद होणार आहे. 

ठक्कर डोम येथील सेंटर बंद..

एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्येत वाढ होत गेली. मेअखेरपर्यंत नियंत्रणात असलेला कोरोना जूननंतर मोठ्या प्रमाणात फैलावला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मागचे सर्व रेकॉर्ड तोडले. ऑक्टोबरमध्ये मात्र कोरोनाचा आलेख खालावला. मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर महापालिकेने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालय, नाशिक-पुणे महामार्गावरील समाजकल्याण, मेरी येथील वसतिगृह, ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये एक हजार ५२५ बेडची व्यवस्था केली; परंतु ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानंतर खाटा मिळत नसल्याने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा अधिग्रहीत करताना तब्बल चार हजार ३४९ पर्यंत खाटांची संख्या पोचविली. ७२ खासगी रुग्णालये कोविड सेंटर म्हणून जाहीर करण्यात आली. सध्या महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये शंभरच्या आत रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण आरक्षित खाटांपैकी ९५ टक्क्यांपेक्षा खाटा रिक्त असल्याने खासगी रुग्णालयांमधील आरक्षित खाटा रद्द करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी समाजकल्याण व मेरी येथील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. आता ठक्कर डोम येथील सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

७३ रुग्णांवर उपचार 

ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये आठ, तर नवीन बिटको ३५ व झाकिर हुसेन रुग्णालय कोविड सेंटरमध्ये ३० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कमी जोखीम असलेल्या बहुतांश कोरोना रुग्णांवर घरात उपचार केले जात आहेत. दरम्यान, सरकारी कोविड सेंटर बंद होत असताना शहरातील खासगी रुग्णालयांमधील राखीव खाटांवरील आरक्षण हटविण्याची मागणी रुग्णालयाकडून होत आहे. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Center in Nashik is being closed nashik marathi news