जेव्हा महापौरांच्या बंगल्याला वाटते कोरोनाची भीती; होणार ५१ लाख रुपयांची उधळण

विक्रांत मते
Thursday, 21 January 2021

खासगी रुग्णालयांमध्येही कोविड बेड पूर्णपणे रिक्त असल्याने कोविड राखीव बेड रद्द करण्याची मागणी होत आहे. असे असताना महापौरांच्या रामायण बंगल्याला कोविड प्रोटेक्शन कोटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जवळजवळ संपुष्टात येत असताना कोविड सेंटरदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे महापालिकेचा कारभार पाहणारे प्रथम नागरिक सतीश कुलकर्णी यांच्या ‘रामायण’ बंगल्याला, तसेच मुख्यालयातील सर्व कार्यालयांना पुढील वर्षभर कोविडची भीती वाटू लागल्याने त्यासाठी ५१ लाख रुपये खर्च करून कोविड प्रोटेक्शन कोटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

सुमारे एक लाख चौरसमीटर क्षेत्रात पेस्टिंग

सध्या शहरातून कोविड आजार हद्दपार झाला असून, महापालिकेने उभारलेल्या पाच कोविड सेंटरपैकी दोन सेंटर बंद करण्यात आले आहेत, तर ठक्कर डोम येथील सेंटरमध्ये रुग्णभरती न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांमध्येही कोविड बेड पूर्णपणे रिक्त असल्याने कोविड राखीव बेड रद्द करण्याची मागणी होत आहे. असे असताना महापौरांच्या रामायण बंगल्याला कोविड प्रोटेक्शन कोटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल ५१.५२ लाख रुपये खर्च करण्यासाठी स्थायी समितीवर प्रस्ताव सादर करण्यात आला असून, गुरुवारी (ता. २१) बैठकीमध्ये मंजुरी दिली जाणार आहे. मे. देवगिरी इन्फोमीडिया टेक्नॉलॉजीज एलएलपी या कंपनीचा ४६ रुपये प्रतिचौरस फूट असा कमी दर आल्याने त्या कंपनीला काम दिले जाणार आहे. महापौर कार्यालयात लोकांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोविड प्रतिबंधात्मक पेस्टिंग पुढील एक वर्षासाठी केले जाणार आहे. सुमारे एक लाख चौरसमीटर क्षेत्रात पेस्टिंग केले जाणार आहे. 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष 

एकीकडे विकासकामांना निधी नसल्याने उड्डाणपुलांसह कर्ज काढण्यास विरोधी पक्ष शिवसेनेकडून विरोध झाला आहे. गेल्या महिनाभरापासून भाजपला कोंडीत पकडणाऱ्या शिवसेनेकडून कोविड पेस्टिंगबाबत स्थायी समितीमध्ये काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid protection coating on the mayors Ramayana bungalow nashik marathi news