पळसन परिसरात त्या कावळ्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लूनेच'! पशुसंवर्धन विभागाची माहिती

हंसराज भोये
Monday, 25 January 2021

यासंदर्भात प्रयोगशाळेचा अहवाल रविवारी (ता.२४) प्राप्त झाला असून, बर्ड फ्लूनेच कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सूचनांचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शीघ्र कृती दलाची व्यवस्था करण्यात आली असून, मार्गदर्शक सूचनादेखील लागू करण्यात आल्या आहेत. 

पळसन (नाशिक) : सुरगाणा शहरापासून बारा ते पंधरा किलोमीटरवर उंबरदे-पळसन परिसरातील जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाने घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

घाबरून न जाण्याचे आवाहन 

याबाबत माहिती अशी की, जानेवारीला सुरगाणा तालुक्यातील उंबरदे-पळसन परिसरात आठ ते दहा कावळे मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याच्या भीतीने खळबळ उडाली होती. त्यामुळे कावळ्यांचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यासंदर्भात प्रयोगशाळेचा अहवाल रविवारी (ता.२४) प्राप्त झाला असून, बर्ड फ्लूनेच कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सूचनांचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शीघ्र कृती दलाची व्यवस्था करण्यात आली असून, मार्गदर्शक सूचनादेखील लागू करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

अशी घ्यावी काळजी... 

पशुसंवर्धन विभागाने लागू केलेल्या सूचनांमध्ये गावात पक्ष्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास पशुवैद्यक संस्थेस तत्काळ कळवावे. मृत पक्षी, अंडी यांची विल्हेवाट खड्डे खोदून करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीने कोंबड्यांची खुराडे, गायींचे गोठे, गावातील गटारी, नाल्या, पशु-पक्ष्यांचा वावर असणाऱ्या भिंती, जागा यांची वेळोवेळी फवारणी करावी. उघड्या कत्तलखान्यात मटण विक्रीची जागा नियमित स्वच्छ ठेवावी. निर्जंतुकीकरण व जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी. मांस व अंडी खाण्यासाठी घाबरून जाऊ नये. अंडी, मटण व्यवस्थित धुवून, उकडून, शिजवून खावे.  

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crows in Palsan area have contracted bird flu nashik marathi news