मालेगाव शहरात रात्रीची संचारबंदी लागू! आज 54 पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू

प्रमोद सावंत
Tuesday, 18 August 2020

सोमवारी शहर व परिसरात रुग्णसंख्येने द्विशतक गाठले. शहरातील 193 ॲक्टीव्ह रुग्णांवर सहारा व मसगा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. आज तब्बल 168 अहवाल प्राप्त झाले. यातील 54 पॉझिटिव्ह तर 114 निगेटिव्ह रुग्ण आले.

नाशिक/मालेगाव : शहर व परिसरातील कोराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी शहरात आजपासून सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी रात्री उशिरा काढले.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सोमवारी (ता.17) येथील भेटीत याबाबत सूचना केल्या होत्या. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली. मंगळवारी (ता.18) 54 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मनमाड येथील 65 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितासह शहरातील कलेक्टर पट्टा भागातील 61 वर्षीय संशयित पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा > "कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय?" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण

54 पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू

सोमवारी शहर व परिसरात रुग्णसंख्येने द्विशतक गाठले. शहरात सुमारे साडेसहाशे तर तालुक्यात दीडशेहून अधिक कोरोनाबाधित आहेत. शहरातील 193 ॲक्टीव्ह रुग्णांवर सहारा व मसगा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. आज तब्बल 168 अहवाल प्राप्त झाले. यातील 54 पॉझिटिव्ह तर 114 निगेटिव्ह रुग्ण आले. मनमाड येथील कोरोनाबाधिताचा काल सायंकाळी तर कलेक्टर पट्टा भागातील संशयिताचा आज पहाटे मृत्यू झाला. कलेक्टरपट्ट्यातील 61 वर्षीय पुरुषाला सोमवारी दुपारीच अंत्यवस्थ स्थितीत सहारामध्ये दाखल करण्यात आले. स्वॅब घेण्यापुर्वीच उपचार सुरु असताना पहाटे त्यांचे निधन झाले. आज 21 जणांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. आठ रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले. नव्याने 36 रुग्ण दाखल झाले. 270 जणांचे घशाचे स्त्राव घेण्यात आले. चारशेहून अधिक अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

संचारबंदी लागू होताच पोलिस सतर्क

प्रांताधिकारी शर्मा यांनी रात्रीची संचारबंदी लागू करताच पोलिस प्रशासन सतर्क झाले. विविध पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपापल्या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात संचारबंदीबाबत ध्वनीक्षेपकावर जाहीरपणे आवाहन केले. दरम्यान वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महापालिका आयुक्त ञ्यंबक कासार यांनी महापालिकेत अत्यावश्‍यक कामांसाठीच नागरिकांना प्रवेश व कोविड संबंधित आवश्‍यक कामे चालू ठेवण्याबाबतचा आदेश काढला आहे. महापालिकेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे व सामाजिक अंतराचे पालन करणे बंधकारक आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांना या सूचना पाठविण्यात आल्या असून या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.  

 

संपादन - रोहित कणसे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: curfew in malegaon due to corona positive nashik marathi news