हिमालयाचे सफरचंद चक्क सह्याद्रीच्या कुशीत? दाभाडीच्या शेतकऱ्याची अनोखी धडपड; उत्पादकांच्या आशा पल्लवित

apple farming dabhadi.jpg
apple farming dabhadi.jpg

दाभाडी (जि.नाशिक) : काश्मीरमधील थंड हवामानातील सफरचंद फळाचे नवे वाण उष्ण व कमी थंडीच्या वातावरणात यशस्वी झाल्याने हिमाचल प्रदेशसह राजस्थानात यशस्वीपणे रुजलेले सफरचंद आता हिमालयातून थेट सह्याद्रीच्या कुशीत विराजमान झाले आहेत.

दाभाडी येथील प्रयोगशील शेतकऱ्याची अनोखी धडपड 

प्रयोगशील दाभाडीच्या माळरानावर फुलणारे सफरचंद उत्तर महाराष्ट्रासाठी दिशादर्शक तर ठरणार आहेच. शिवाय तीनही ऋतूंत सफरचंदासह खजुराची नवी लागवड बहरल्याने उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फळबाग उत्पादनात प्रयोगांचा वारसा लाभल्याने दाभाडी गावाला ‘शेती प्रयोगांची टाकसाळ’ असा लौकिक प्राप्त आहे. नगदी पिकांचा अट्टाहास हा येथील शेती प्रयोगांचा मुख्य वकुब होय. हळद, मसाल्याचे पदार्थ, डाळिंब ही या भागाची फलनिष्पत्ती सर्वश्रुत आहेच. डाळिंब हाताबाहेर जात असल्याने पर्यायी पिकांची चाचपणी सुरू आहे. तोच कित्ता गिरवत येथील मानकर परिवाराने सफरचंद व खजुराची लागवड करून आगळा वस्तुपाठ अधोरेखित केला आहे. त्यांच्या नव्या फळपीक लागवडची वर्षपूर्ती वाटचाल औत्सुक्याचा विषय बनला आहे. 

हिमालयाचे सफरचंद सह्याद्रीच्या कुशीत! 
सफरचंद हे काश्मीरच्या थंड हवामानातील हुकमी पीक! मात्र दाभाडीतील ध्येयवेड्या प्रयोगशील संशोधक शेतकऱ्याने उन्हाळी भागासाठी सफरचंदाचे नवं वाण शोधून काढले आहे. वर्षापूर्वी गटविकास अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले हिरामण मानकर हे नव्या प्रयोगांच्या शोधात होते. विविध प्रयोगांत सतत कार्यरत असलेले वडील गिसाकाचे सेवानिवृत्त मुख्य रसायनशास्त्रवेत्ता शिवराम मानकर यांचे मार्गदर्शन घेत सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला. ‘सफरचंदाला आपले हवामान मानवेल का?’ हा प्रश्न असूनही मानकर परिवाराने नव्या लागवडीचा ध्यास घेतला. प्रयोगशील वडिलांसह कैलास मानकर, मोहन मानकर, यशवंत मानकर या भावंडांनी चर्चेतून उपायोजना राबविली. त्यामुळे तीनही ऋतूंत अंगावर घेतलेल्या नव्या पिकावर चांगले परिणाम दिसल्याने परिवाराचा उत्साह वाढला आहे. 

उत्पादकांच्या आशा पल्लवित
सफरचंदाच्या सोबतीलाच गुजरातच्या कच्छ भागातून खजुराचे बरई वाणाची स्वतंत्र लागवड केली आहे. तर याच खजूर पिकात आंतरपीक म्हणून पेरूचे थाई-७ वाणाची लागवड केली आहे. येथील दाभाडी-आघार बु. रस्त्यावरील शेतमळ्यात परराज्यातील पिकांची अनोखी प्रयोगशाळाच बनली आहे. कश्मीरची मक्तेदारी असलेल्या या पिकावर संशोधन करत उष्ण आणि अल्प पावसासह थंडीच्या भागात तग धरणारे सफरचंदाचे नवे वाण शोधण्याची किमया हिमाचल प्रदेश येथील हरिमन शर्मा या अवलिया शेतकऱ्याने १९९९ मध्ये साधली. या प्रयोगाला भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय नावीन्य संस्थान’ (NIF) या संस्थेने प्रोत्साहन दिल्याने या पिकाचा प्रवास भारताच्या दक्षिणेकडे सरकतो आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

...अशी होते लागवड 
क्र./पिकाचे नाव/लागवड क्षेत्र/ रोप संख्या/ दोन झाडांतील अंतर 
१)/सफरचंद/ ६० आर./३१२/१५ बाय १५ 
२)/ खजूर/४०आर./४२/३० बाय ३० 
३)/आंतरपीक पेरू थाई-७/ ४०आर./२१५/१५ बाय ८ 

प्रारंभी हिमाचल प्रदेशसह राजस्थानच्या वातावरणात सफरचंदाचे हे नवीन वाण यशस्वी झाले. गत अकरा वर्षांत जर्मनी, नेपाळ, बांगलादेशसह देशातील तब्बल २८ राज्यांत HRMN-९९ हे वाण रुजले आहे. -हरिमन शर्मा, सफरचंद वाणाचे संशोधक, हिमाचल प्रदेश 
 
संवाद, माहितीचे पृथक्करण आणि नव्याचा ध्यास, यातून हे नवे आव्हान हाती घेतले आहे. सफरचंदाच्या वाणाचे संशोधक आणि येथील हवामानाचा अभ्यास करूनच हे धारिष्ट्य केले आहे. अपेक्षित परिणाम दिसत आहेत. -हिरामण मानकर, सफरचंद व खजूर लागवडधारक, दाभाडी 

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com