संघर्ष आणि फक्त संघर्षच! कापणीला आलेलं पिक शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जमीनदोस्त; पाहा व्हिडिओ

प्रमोद सावंत
Saturday, 12 September 2020

धरणाखालील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामधून वाट काढणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतातील मका, बाजरी, कांदा ही पिके आडवी होत जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आपदग्रस्त शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अनेकांची शेतजमीन वाहून गेल्याने नुकसानीचा नेमका अंदाज समजू शकला नाही. 

नाशिक : वळवाडे (ता. मालेगाव) शिवारातील कळमदरा धरण शुक्रवारी (ता. ११) दुपारी चारच्या सुमारास फुटले. धरणाचे पाणी परिसरातील विविध शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने कापणीवर आलेले उभे पीक वाहून गेले. अनेक शेतकऱ्यांची शेतजमीनच वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. अचानक पुराच्या लोंढ्याने जनावरांचा बचाव करण्याचीही संधी न मिळाल्याने काही जनावरे पूरपाण्यात वाहून गेली.

शेतातील पिके जमीनदोस्त

धरण फुटल्यानंतर पुराच्या लोंढ्याने धरण क्षेत्रातील पिंटू घुले यांच्या सात शेळ्या, दोन गायी व एक वासरू पुरात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वाघखोरे वस्तीवरील अण्णा अहिरे यांच्या कांद्याच्या चाळीत पुराचे पाणी शिरल्याने चाळीतील संपूर्ण कांदा ओला होऊन लाखोंचे नुकसान झाले. शुक्रवारी धरणाला अचानक भगदाड पडले. धरणाखालील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामधून वाट काढणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतातील मका, बाजरी, कांदा ही पिके आडवी होत जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आपदग्रस्त शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अनेकांची शेतजमीन वाहून गेल्याने नुकसानीचा नेमका अंदाज समजू शकला नाही. 

मोठ्या पाणीसाठ्यामुळे एका बाजूला भगदाड

अंबासन, वळवाडे, वाघखोरे परीसरातील डोंगररांगांमधून वाहणाऱ्या नाल्यांचे पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या पुरातन काळातील या धरणाला परिसरात संततधारेमुळे व मोठ्या पाणीसाठ्यामुळे एका बाजूला भगदाड पडले. हीच दुर्घटना रात्री झाली असती तर मोठी जीवितहानी होण्याची भीती परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक स्तर लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता संजय पाटील, वळवाडेचे ग्रामसेवक हेमंत सावंत, तलाठी मनोज अहिरराव आदींसह परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नुकसानीचा त्वरित पंचनामा करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

वळवाडे शिवारातील कळमदरा धरण फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धरण परिसरात कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्याने धरणाच्या भरावाला भगदाड पडले. परिस्थितीची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. - संजय पाटील अभियंता, लघुपाटबंधारे, स्थानिक स्तर 

कळमदरा धरण फुटल्याने वळवाडे, अंबासन व गारेगावअंतर्गत वाघखोरे वस्तीवरील काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतरच नुकसानीची नेमकी आकडेवारी कळू शकेल. - हेमंत सावंत ग्रामसेवक, वळवाडे  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to crops due to bursting of Kalamadare dam nashik marathi news