डावणी रोगामुळे मालेगावला द्राक्षबागा संकटात; शेतकरी हतबल

प्रमोद सावंत
Friday, 9 October 2020

येसगाव, चंदनपुरी, मळगाव, मथुरपाडे, भुतपाडे, साकुरी झाप आदी भागांत सुमारे दीड हजार हेक्टरवर द्राक्षबागा फुलल्या आहेत. या भागातील उत्पादक अर्ली बहार घेत असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये द्राक्ष बाजारात येतात.

नाशिक/मालेगाव : तालुक्याच्या दक्षिण भागातील येसगाव व परिसरात असलेल्या द्राक्षबागा अतिवृष्टी व डावण्या रोगामुळे संकटात आल्या आहेत. रोगामुळे हाती आलेले पीक नष्ट होत आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील द्राक्ष उत्पादकांनी केली आहे. 

द्राक्ष उत्पादक अडचणीत

येसगाव, चंदनपुरी, मळगाव, मथुरपाडे, भुतपाडे, साकुरी झाप आदी भागांत सुमारे दीड हजार हेक्टरवर द्राक्षबागा फुलल्या आहेत. या भागातील उत्पादक अर्ली बहार घेत असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये द्राक्ष बाजारात येतात. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी रोगामुळे तीन वर्षांपासून उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत असून, पीक वाया जात आहे. परिणामी द्राक्ष उत्पादक अडचणीत आले आहेत.

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

भरीव मदतीची अपेक्षा

या वर्षी द्राक्ष बहार चांगला होता. सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधारेमुळे १५ दिवस बागांमध्ये पाणी भरले होते. अतिवृष्टीमुळे द्राक्षांना हानी पोचली. त्यातच पाऊस थांबल्यानंतर डावणी रोगाने द्राक्षांना घेरले. महागडी औषधे फवारूनही रोग नियंत्रणात येत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाले आहेत. आता शासनाने भरीव मदत देऊन द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी दादाभाऊ आहिरे, तात्यासाहेब ठाकरे, गोरख ठाकरे, श्रीकांत पाटील, संजय शेलार, भगवान शेलार, सुरेश शेलार आदी शेतकऱ्यांनी केली. 

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dawani disease on grapes crop in malegaon nashik news