जेईई मेन्‍सच्‍या अर्जासाठी शनिवारपर्यंत मुदत; विद्यार्थ्यांसाठी 'ही' संधी उपलब्ध

अरुण मलाणी
Wednesday, 13 January 2021

ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रासंदर्भात चार विकल्‍प द्यावे लागतील. या विकल्‍पांपैकी एक शहर देण्याचा एनटीएतर्फे प्रयत्‍न केला जाईल. उमेदवारांना एकापेक्षा जास्‍त सत्रात परीक्षा देताना परीक्षा केंद्रासाठीच्‍या शहराचा पर्याय वेगवेगळा निवडण्याची मुभा असेल. 

नाशिक : जॉइंट एन्ट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स २०२१ परीक्षेची नोंदणीप्रक्रिया अंतिम टप्प्‍यात आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीमार्फत घेतल्‍या जाणाऱ्या या परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत शनिवार (ता. १६)पर्यंत आहे. निर्धारित शुल्‍क रविवार (ता. १७)पर्यंत ऑनलाइन स्‍वरूपात भरता येणार आहे. फेब्रुवारी ते मे या कालावधीत चार वेळा ही परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्‍ध असेल. 

फेब्रुवारी ते मेदरम्‍यान चार वेळा परीक्षेची विद्यार्थ्यांना संधी 

आयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्‍स परीक्षा द्यावी लागते. यंदा कोविडमुळे चार वेळा ही परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना चारही परीक्षांना प्रविष्ट होण्याची संधी असेल. अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी बी. ई., बी. टेक करिताची जेईई मेन्‍स परीक्षा ऑनलाइन स्‍वरूपात संगणकावर घेतली जाईल. बी. आर्क. आणि बी. प्‍लॅनिंगसाठीच्या जेईई मेन्‍स परीक्षेत लेखी पेपर व ड्रॉइंगवर आधारित पर्सेंटाइल असतील. इयत्ता बारावी किंवा समकक्ष परीक्षेत २०१९, २०२० मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी किंवा २०२१ च्‍या परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येईल. ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रासंदर्भात चार विकल्‍प द्यावे लागतील. या विकल्‍पांपैकी एक शहर देण्याचा एनटीएतर्फे प्रयत्‍न केला जाईल. उमेदवारांना एकापेक्षा जास्‍त सत्रात परीक्षा देताना परीक्षा केंद्रासाठीच्‍या शहराचा पर्याय वेगवेगळा निवडण्याची मुभा असेल. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

जेईई मेन्‍सच्‍या तारखा अशा
  
* २३ ते २६ फेब्रुवारी 
* १५ ते १८ मार्च 
* २७ ते ३० एप्रिल 
* २४ ते २८ मे  

हेही वाचा >  संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline for applications for JEE Mains is Saturday nashik educational news

Tags
टॉपिकस
Topic Tags: