अतिआत्मविश्वास तरुणांच्या मुळावर! कोरोनाबाधितांसह मृत्यूचे प्रमाण अधिक; महापालिकेच्या अहवालात उघड 

अरुण मलाणी
Thursday, 1 October 2020

तरुणांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी असल्याचा दावा केला जातो. मात्र सप्टेंबरमध्ये तरुणांनाच अधिक प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाले असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.

नाशिक : तरुणांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी असल्याचा दावा केला जातो. मात्र सप्टेंबरमध्ये तरुणांनाच अधिक प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाले असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामागे अतिआत्मविश्‍वास हेच कारण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता ज्येष्ठांप्रमाणेच तरुणांनीही काळजी घेण्याचा सल्ला देण्याची वेळ आली आहे. 

ज्येष्ठांप्रमाणेच तरुणांनीही काळजी घेण्याचा सल्ला
शहरात एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. टप्प्याटप्प्याने रुग्णांमध्ये वाढ होत गेली. मेच्या मध्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर बाधितांचा आकडा दुपटीने वाढत गेला. जून, जुलै व ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये हजारांच्या पटीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. २० ते ५० वयोगटापर्यंतच्या नागरिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती अधिक असते. शहरात अनलॉक जाहीर झाल्यानंतर याच वयोगटातील नागरिकांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

बिनधास्तपणा नडला 
अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले. तरुणांमध्य रोगप्रतिकार शक्ती अधिक असल्याने त्यांना काहीच होत नाही. या अतिआत्मविश्‍वासामुळे मास्क न वापरणे, दुचाकीवर डबलसीट प्रवास करणे, सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे आदी प्रकारामुळे तरुणांना कोरोनाने घेरल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने काढला आहे.  

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

कोरोनाबाधितांसह मृत्यूचे प्रमाण अधिक
ऑगस्टच्या सुरवातीला तरुणांमध्ये कोरोनावाढीचे प्रमाण अधिक होते. मात्र, शेवटच्या आठवड्यात ते कमी झाले. सप्टेंबरमध्ये पुन्हा तरुणांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले. शहरात आतापर्यंत एक लाख ८२ हजार ६९ तपासण्या करण्यात आल्या. राज्यात तपासण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ९३ हजार घरांमध्ये गंभीर आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात तीन लाख ८१ हजार, २३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. एकूण तपासण्यांपैकी ९० हजार ७६१ रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचा समावेश आहे. तपासण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे कोरोना संसर्गाला आळा घालण्यास मदत झाली आहे. 

हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

वयोगट कोरोनाबाधितांची संख्या 
० ते १० १,८२५ 
११ ते २० ३,८३७ 
२१ ते ३० ८,८४० 
३१ ते ४० ८,९०६ 
४१ ते ५० ८,४३३ 
५१ ते ६० ७,४२८ 
६० च्या वर ४,९३७ 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deaths with corona of youth nashik marathi news