bank nashik
bank nashik

जिल्हा बँकेतील ठेवींसाठी उपोषणाचे हत्यार; महिला पतसंस्थेचा प्रशासनाला इशारा 

नाशिक/सिन्नर : केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची घसरलेली गाडी रुळावर येत नसल्याने जिल्हा बँकेत गुंतवणूक करणाऱ्या पतसंस्थांसमोरील अडचणीत वाढ होत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी येथील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेचेही ८४ लाख रुपये जिल्हा बँकेत अडकले असून, ते परत मिळवण्यासाठी संस्थेच्या संचालकांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 

खातेदार संभ्रमात

जिल्हा बँकेकडे अडकलेल्या लाखो रुपयांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी २०१८ पासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. रकमेची मागणी करूनही बँक प्रशासन हात वर करत असल्याने संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ पाहत आहे. संस्था अल्पबचत प्रतिनिधींच्या माध्यमातून खातेदाराकडून जमा झालेली दैनंदिन ठेव जिल्हा बँकेत असणाऱ्या खात्यावर भरणा करत असे. मात्र, या रकमेचा परतावा करण्यास बँकेकडून विलंब होत असल्याने खातेदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

उपोषणास बसण्याची तयारी

महिलांची गुंतवणूक जिल्हा बँकेच्या धोरणामुळे अडचणीत आली असल्याने संचालक मंडळासमोर पेच निर्माण झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनदेखील जिल्हा बँक टप्प्याटप्प्याने का होईना ठेवी परत करत नसल्याने संस्थेचे व्यवस्थापक यशवंत गवळी यांनी उपोषणास बसण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या या निर्णयास संचालक मंडळाने पाठिंबा दिला आहे. नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर केला आहे. संस्थापक अध्यक्ष मालती गवळी, अध्यक्ष शोभा पठाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शशिकला अत्रे यांनी जिल्हा बँकेतील गुंतवणूक परत मिळवण्यासाठी उपोषण केले पाहिजे, असा ठराव मांडला. त्यास उपाध्यक्ष ताराबाई कहांडळ इतर संचालक व सेवकांनीही पाठिंबा दर्शवला. 

सहकार विभागाच्या सूचनेनुसार पतसंस्थांनी जिल्हा बँकेत गुंतवणूक केली आहे. नोटाबंदीनंतर बँक अडचणीत आल्याने ही गुंतवणूक परत करण्याची जबाबदारी सहकार विभागाची आहे. मात्र, सहकार विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शहरी व ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांचे अर्थकारण अडचणीत आले आहे. आगामी काळात पतसंस्थांची गुंतवणूक सुरक्षित परताव्यासह मिळावी म्हणून जिल्हा स्तरावर आंदोलन छेडले जाईल.  - नारायण वाजे, कार्याध्यक्ष, राज्य पतसंस्था फेडरेशन  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com