esakal | ग्रामपंचायतच्या प्रशासक नेमणुकीला मिळेना मुहूर्त! इच्छुक गावपुढाऱ्यांच्या उत्साहाला मुरड 
sakal

बोलून बातमी शोधा

grampanchayt elections.jpg

अद्याप प्रशासक नियुक्तीचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेला नसल्याने गावोगावचे पुढारीही कुणाची नियुक्ती होते, याकडे लक्ष ठेवून आहेत. गेल्या आठवडाभरात राज्यातील अनेक जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विस्ताराधिकाऱ्यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे.

ग्रामपंचायतच्या प्रशासक नेमणुकीला मिळेना मुहूर्त! इच्छुक गावपुढाऱ्यांच्या उत्साहाला मुरड 

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक / येवला : ग्रामविकास विभागाने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विविध व्यक्तींची प्रशासक म्हणून नियुक्तीचा निर्णय वादात सापडल्याने अखेर प्रशासकपदी विस्ताराधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. त्यानुसार सर्वत्र विस्ताराधिकाऱ्यांची नेमणूक होत असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरही याच पद्धतीने नेमणुकीची तयारी पूर्णत्वाकडे आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपूनही नेमणुका न झाल्याने गावोगावी प्रतीक्षा आहे. पुढील एक-दोन दिवसांत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. 

इच्छुक गावपुढाऱ्यांच्या उत्साहाला मुरड; अधिकाऱ्यांचीच वर्णी लागणार 
राज्याच्या १९ जिल्ह्यांतील एक हजार ५६६ व नाशिक जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जूनदरम्यान संपली, तर जुलै ते डिसेंबरदरम्यान १२ हजार ६६८ व जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ठिकाणी प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीच्या नियुक्तीचे अधिकार शासनाने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. गेल्या महिन्यात ग्रामविकास विभागाने रोजच नवीन सूचना केल्याने गोंधळ अजूनच वाढला. त्यानंतर न्यायालयाने अधिकाऱ्यांच्याच नियुक्तीचे आदेश दिले असून, अजूनही काही याचिकांवर निर्णय बाकी आहे. मात्र ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने कामकाजाला अडचण नको म्हणून आता विस्ताराधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. 

प्रशासक नेमणुकीला मिळेना मुहूर्त 
जिल्ह्यात जुलैमध्ये ३७, तर ऑगस्टमध्ये १५९ ग्रामपंचायतींची मुदत संपत असून, यातील निम्म्यांची मुदत ८ ऑगस्टला संपली आहे. मात्र अद्याप प्रशासक नियुक्तीचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेला नसल्याने गावोगावचे पुढारीही कुणाची नियुक्ती होते, याकडे लक्ष ठेवून आहेत. गेल्या आठवडाभरात राज्यातील अनेक जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विस्ताराधिकाऱ्यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. नाशिक जिल्ह्यातही गटविकास अधिकाऱ्यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतनिहाय विस्ताराधिकाऱ्यांची नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांची नावे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविली आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीसह बांधकाम, शिक्षण, कृषी, लघुपाटबंधारे या विभागाच्या विस्ताराधिकाऱ्यांसह पर्यवेक्षक शाखा अभियंता, सहाय्यक गटविकास अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असून, वेळ पडल्यास केंद्रप्रमुखांचीही ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी निवड होणार आहे. या सर्व प्रक्रियेत इतके दिवस प्रशासक पदासाठी फिल्डिंग लावून सरपंचपदाच्या खुर्चीचे स्वप्न पाहणाऱ्या गावपुढाऱ्यांच्या अपेक्षांना मात्र लगाम लागला आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा
 
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 
जुलै - ३७ 
ऑगस्ट - ४५९ 
सप्टेंबर - २ 
ऑक्टोबर - १० 
नोव्हेंबर - १ 
डिसेंबर - १० 
एकूण – ५१९ 

हेही वाचा >  थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

प्रशासक नियुक्ती ग्रामपंचायतींची संख्या 
बागलाण – ४० 
चांदवड - ५३ 
देवळा - ११ 
येवला - ४४ 
नाशिक - २५ 
नांदगाव - ५९ 
मालेगाव - ९९ 
इगतपुरी - ४ 
दिंडोरी - १६ 
त्रंबक - ३ 
सिन्नर - १०० 
निफाड - ६५ 
एकूण - ५१  

संपादन - ज्योती देवरे