श्री. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात स्थान मिळावे; तृतीय पंथीयांची मागणी

vani chabina.jpg
vani chabina.jpg

नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाच्या निवडीवरुन स्थानिकांची नाराजी क्षमली नाही. शेकडो वर्षांपासून आदिमायेच्या मंदीर शिखरावर कीर्तीध्वज फडकविणारे दरेगावचे गवळी कुटुंबीय, किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्यासह कावडीमंडळ व पालखी सोहळ्याच्या प्रतिनिधींनीही संस्थानच्या विश्वस्त मंडळ व उपसमितीत सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी मागणी जोर धरु लागली आहे.

तृतीय पंथीयांच्या प्रतिनिधींचाही विचार करावा 

श्री. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात १ ऑक्टोबर २०२० ते ३० सप्टेबर २०२५ या पाच वर्षांसाठी नुकतीच पाच विश्वस्तांची निवड करण्यात आली. मात्र या विश्वस्त मंडळात स्थानिकांना प्रतिनिधीत्व न मिळाल्याने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर तोडगा म्हणून संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश गणेश देशमुख यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन संस्थानच्या घटनेतील ३८ कलमान्वये उपसमिती करुन त्यात स्थानिकांना सदस्यत्व देण्याबाबत कार्यवाही करुन दोन सदस्यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर स्थानिकांच्या नाराजी नाट्यावर पडदा पडत नाही तोच सुमारे पाचशे वर्षांपासून समुद्रसपाटीपासून ४५६९ फूट उंचीवर सप्तश्रृंगी गडाच्या मंदीर शिखरावर वर्षभरातून दोनदा कीर्तिध्वज फडकवणारे दरेगांवचे गवळी पाटील कुटुंबिय व ग्रामस्थांनी तसेच किन्नर समाजाचे अराध्य दैवत म्हणूनही आदिमाया सप्तशृंगी देवीचा महिमा असल्याने दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेस राज्यासह देशातून हजारो तृतीय पंथीयांच्या प्रतिनिधींचीही ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात स्थान मिळावे यासाठी मागणी होवू लागली आहे. 

विश्वस्त मंडळाकडे अर्ज

तृतीय पंथीयांच्या छबिना मिरवणूकीसाठी दिवसेंदिवस किन्नर समुदाय बरोबरच सर्वसाधारण भाविकांची गर्दी वाढत आहे. किन्नर समुदाय स्थानिक रहिवाशी नसला तरी आदिमायेच्या दरबारी किन्नर समुदायाचे प्रतिनिधी म्हणून संस्थानच्या विश्वस्त संस्थेमध्ये स्थान मिळण्याची मागणी आखिल भारतीय किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी केली आहे. तसेच नुकत्याच प्रतिवर्षी दोन सदस्य म्हणून सप्तशृंगी गड ग्रामस्थांनी चिठ्या टाकून निवड केलेल्या सदस्यांत समाजास प्रतिनिधीत्व न मिळाल्याने सदस्य म्हणून घेण्यात यावे यासाठी रोहित आहिरे, धनेश गायकवाड, ईश्वर कदम, प्रकाश कडवे यांनीही विश्वस्त मंडळाकडे अर्ज केले आहे. 

दरम्यान कोजागिरी पौर्णिमा व कावड यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने कावडीधारक तसेच नवरात्रोत्सव व चैत्रोत्सवासाठी ठिकठिकाणच्या पालख्या दरवर्षी गडावर येत असतात. यातही काही कावड मंडळ व पालखी शेकडो वर्षांपासून चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव व कोजागिरी उत्साहात सहभागी होत असल्याने कावडीधारक व पालखी यात्रा मंडळाचे प्रश्न, अडीअडचणी व सुविधा उपलब्धीसाठी कवड न पालखी मंडळाच्या प्रतिनिधींनाही विश्वस्त मंडळ व उपसमितीत स्थान मिळावे यासाठी मागणी जोर धरु लागली आहे.

70 वर्षांपासून सखाराम गुरुंच्या माध्यमातून आदिमायेचा महिमा सर्वदुर पोहचण्यासाठी परंपरा आम्हीही पुढे निरंतर चालूच ठेवल्याने किन्नर समुदाय मोठ्या संख्येने गडावर येत आहे. त्यामूळे विश्वस्त मंडळाने आईच्या दरबारात भेदभाव न करता आम्हालाही समितीत स्थान द्यावे. अन्यथा आम्हाला यासाठी आंदोलन करावे लागेल. - महामंडलेश्वर पायलजी नंद गिरी, अखिल भारतीय किन्नर आखाडा

आमचे गवळी पाटील कुटुंब सुमारे पाचशे वर्षांपासून पंरपरेनूसार आमची कुलदेवता, निसर्गदेवता सप्तशृंगी गडाच्या शिखरावर कीर्तीध्वज लावत आहे. यापुढेही पिढीजात असलेली आमची परंपरा निरंतर सुरुच राहणार आहे. - काशिनाथ गवळी (पाटील), कीर्तीध्वजाचे मानकरी, दरेगांव (नांदुरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com